माजी नगरसेवकांकडून नियमांचे उल्लंघन; वाहनांवर महापालिका बोधचिन्हांचा वापर

वसई विरार शहर महापालिकेची मुदत संपून २३ महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून सध्या प्रशासकीय राजवट सुरु आहे.

अतुल मोटे – वसई वार्ताहर आहेत.

वसई विरार शहर महापालिकेची मुदत संपून २३ महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून सध्या प्रशासकीय राजवट सुरु आहे. मात्र, कार्यकाळ संपल्यानंतर देखील शहरातील अनेक माजी नगरसेवकांकडून सर्रासपणे आपल्या वाहनांवर महापालिका बोधचिन्हाचा वापर करत असून पत्रव्यवहार महापालिकेच्या लेटर हेडवरच करून कायद्याचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. गेल्या जून महिन्यात पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यापासून प्रशासक कार्यभार सांभाळत आहेत. कोरोनामुळे निवडणुकही  सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहे. महापौर, उपमहापौर, सभापती, नगरसेवक यांचा कार्यकाळ संपला असून महापालिकेचे सर्व सदस्य माजी झाले आहेत. असे असताना अनेक माजी नगरसेवकांकडून अद्याप देखील आपल्या वाहनांवर महापालिका बोधचिन्हाचा वापर करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींकडून आपल्या वाहनांवर नगरसेवक, असे लिहिलेले स्टिकर दिसून येत आहेत. तसेच पत्रव्यवहारासाठीही महापालिकेच्या लेटर हेडचाच वापर अनेकजण सर्रासपणे करताना दिसत आहेत. महापालिका बोधचिन्हाचा वापर आपल्या वाहनांवर करण्यावर कायद्याने बंदी आहे. एखाद्या माजी सदस्यांनी आपल्या वाहनांवर अशाप्रकारे बोधचिन्हाचा वापर केल्यास तो गुन्हा ठरतो.

महापालिकेकडून सदस्यांना दिलेले लेटरहेडसुद्धा आपल्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर वापरणे बेकायदेशीर आहे. महापालिका कायद्याप्रमाणे महानगरपालिका बोधचिन्हासह महापालिकेच्या लेटरहेडचा दुरुपयोग झाल्यास त्याचा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा दाखल करता येतो. मात्र, वसई विरार शहरात अशाप्रकारे बोधचिन्हांचा तसेच स्टिकरचा वापर होत असतानादेखील महापालिका प्रशासनाकडून अशा बेजबाबदार माजी सदस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते आहे. अनेक माजी नगरसेवक तसेच त्यांची मुले, नातेवाईक, कार्यकर्ते यांच्याकडून महापालिका बोधचिन्ह किंवा नगरसेवक लिहिलेली वाहने वसई विरार शहरात फिरताना दिसतात. अशा बेजाजबदारांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न वसईकर विचारत आहेत.

हेही वाचा –

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सडीज बेबी, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार