विरार : वसई -विरार शहर महानगर पालिकेने शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा शहरातील प्रमुख पाच ठिकाणी बसवली आहे. मात्र ही यंत्रणा निवडणुकीअभावी चालू करण्यासाठी विलंब झाला असल्याचे मत पालिकेच्या उपायुक्तांनी सांगितले आहे. मात्र या यंत्रणा चालू नसल्यामुळे त्याला राजकीय नेत्यांचे बॅनर झळकू लागले आहेत. तर निवडणूक आयोगाने देखील याच यंत्रणेच्या जाळीला जनजागृती करणारा बॅनर जाळण्यास पसंती दिली असल्याचे दिसून आले आहे. मात्र लावण्यात आलेल्या बॅनरमुळे यंत्रणा दिसेनाशी झाली आहे. या यंत्रणेला लावण्यात आलेले बॅनर हटवा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
वसई – विरार शहराची लोकसंख्या मोठ्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे शहराचे शहरीकरण अव्वाच्यासव्वा वाढले आहे. या वाढत्या शहरीकरणामुळे प्रदूषणात देखील वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर वसई -विरार शहर महानगर पालिकेने शहराच्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवली आहे. पालिकेच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या कामकाजामुळे हे काम रखडलेले आहे. लवकरच ते काम चालू केले जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून या कामाची देखरेख तसेच यंत्रणा चालू केली जाणार आहे. पालिकेने हवा प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी जी यंत्रणा बसवली आहे ती लवकरात लवकर चालू करून घ्यावी. शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम वाढले आहे. यामुळे प्रदूषणाचा आकडा वाढू लागला आहे, असे मत माजी नगरसेवक सदानंद पाटील यांनी व्यक्त केले आहे.