विरार :31 डिसेंबर 2024.वर्षाचा शेवटचा दिवस.नेहमीप्रमाणे दुपारी 12.45 ला विरारहून सुटलेली एसी लोकल विरार-नालासोपारा स्थानकादरम्यान आली.इतक्यात मोटरमनच्या लक्षात आले की , रेल्वे रुळ वाकला आहे. त्याने तत्काळ लोकल थांबवून वरिष्ठ अधिकार्यांना याची माहिती दिली. त्यानंतर मागून येणार्या जनरल लोकललाही थांबवण्यात आले. दोन्ही लोकल थांबल्याने अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरून पायी नालासोपारा स्थानक गाठले. रेल्वे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करत फास्ट ट्रॅकवरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवली. रेल्वे कर्मचार्यांनी युद्धपातळीवर काम करून वाकलेला रुळ पूर्णपणे बदलला. त्यानंतर जलद मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी प्रवाशांचा जीव चालकाने वाचल्यामुळे सर्वत्र ठिकाणाहून चालकाचे कौतुक केले जात आहेत. परंतु ट्रॅक नक्की कशामुळे वाकला? याचे नेमके कारण स्पष्ट होऊ न शकल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वेगवान निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला
या घटनेमुळे प्रवाशांना काही काळ गैरसोय सहन करावी लागली. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप राहिले. त्याच्या वेगवान निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवाशांनी मोटरमनचे आभार मानले असून, त्यांच्या सतर्कतेची प्रशंसा केली आहे. रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, ट्रॅक वाकण्याचे कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी रेल्वे ट्रॅकच्या देखभालीवर अधिक भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. मोटरमनच्या निर्णयामुळे एका मोठ्या दुर्घटनेची टांगती तलवार टळली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाकडून अधिक मजबूत सुरक्षा उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.