विरार : वसई -विरारमध्ये काही रिक्षाचालक रिक्षामध्ये आपल्या सोयीसाठी चालकाच्या समोर अतिरक्त आडवा आरसा लावत आहेत. हा आरसा आता महिला प्रवाशांना मोठा त्रासदायक ठरत असल्याची तक्रार महिला प्रवाशांनी केली आहे. या आरशामुळे प्रवासी महिलांना न्याहाळले जात असल्याचे महिलांनी म्हटले आहे.
वसई -विरार शहरात अनेक रिक्षाचालक आपल्या सोयीसाठी चालकाच्या समोर अतिरिक्त आरसा लावतात. हा आरसा लावण्यामागचा कोणताही फायदा नाही आहे. पण अनेकवेळा प्रवासी काही समान मागे विसरून जातात यावेळी या आरशातून हे निदर्शात येते. तसेच अनेकवेळा प्रवाशांशी संवाद सुद्धा साधता येतो, असे काही रिक्षा चालकांनी सांगितले. पण काही आंबट शौकीन प्रवासी अथवा चालक या आरशाचा वेगळा फायदा घेतात. अनेकवेळा रिक्षाचालक चार प्रवासी बसवतात अशावेळी चौथा प्रवासी हा या आरशाच्या समोर येत असल्याने त्याला मागील सर्व प्रवासी ठळक दिसतात.यावेळी अनेकवेळा मागे बसलेल्या महिलांना या आरशातून न्याहाळले जात असल्याचा अनुभव आल्याचे काही महिलांनी सांगितले. अशावेळी महिलांना संकोचित भावना निर्माण होतात.
विरारमधील एका महिला प्रवासी यांनी माहिती दिली की, त्यांना अशा प्रकरचा अनुभव आल्याने त्यांनी ज्या रिक्षात समोर अतिरक्त आरसा असलेल्या रिक्षातून प्रवास करणे टाळले आहे. हा आरसा लावावा की नाही याबात वाहतूक पोलीस अथवा परिवहन कार्यालय यांना विचारणा केली असता याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. परंतु वाहनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त आरसे, टायर्सच्या डिस्कवर टोकदार वस्तू आणि फॅन्सी लाइट्स बसवणे बेकायदेशीर आहे. पण जर महिलांनी अशा पद्धतीच्या काही तक्रारी केल्यास अशा रिक्षाचालकांना हे आरसे काढून टाकण्याचे सांगितले जाईल, असे दोन्ही शाखांनी सांगितले.
अशा प्रकारच्या रिक्षांबाबत ठाण्यामध्ये २०१७ काही महिलांनी तक्रारी केल्यावर वाहतूक पोलिसांनी अनेक रिक्षांवर कारवाई करत हे आरसे काढून टाकल्याला सांगितले होते. तसेच ५०० रुपये दंड वसुली सुद्धा केली होती. त्यानंतर रिक्षामध्ये हे आरसे लागणे बंद झाले होते. परंतु पुन्हा काही रिक्षावाल्यांनी हे आरसे लावण्यास सुरवात केली आहे. यामुळे महिला प्रवाशांना मोठा त्रास सहन करवा लागत आहे. यामुळे वसई -विरार वाहतूक पोलिसांनी अशा रिक्षांवर कारवाईची मागणी केली आहे. आरसे लावावेत की नाही या संदर्भात कोणताही कायदेशीर तरतूद नाही आहे. पण जर कुणी अशी तक्रार केल्यास अशा रिक्षांवर कारवाई केली जाईल, असे वाहतूक पोलीस अधिकार्यांनी बोलताना सांगितले.