विरार : विरार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चोरी, जबरी चोरी, वाहन चोरी, मालमत्तेच्या गुन्ह्याचा कौशल्याने तपास करून, 11 गुन्हे उघडकीस आणून त्यातील 4 लाख 96 हजार 116 रुपये किमतीचे तर 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 7 वाहने तसेच भारत देशातील वेगवेगळ्या राज्यातून तथा महाराष्ट्र राज्यातून गहाळ झालेले वेगवेगळ्या कंपन्यांचे 26 महागडे मोबाईल असा एकूण 23 लाख 96 हजार 116 रुपये किंमतीचा मुद्देमाल विरार पोलिसांनी जप्त केला.त्यानंतर बुधवार 18 डिसेंबर रोजी तक्रारदारांना विरार पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना हा मुद्देमाल परत करण्यात आला आहे.
चोरी, घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी, तसेच मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी विरार पोलीस ठाण्यात वाढल्या होत्या. मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांना नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रतापराव कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक निर्माण करून या गुन्ह्याचा तपास लावून तक्रारदारांना त्याचा चोरी व गहाळ झालेला मुद्देमाल परत देण्यास यश आले आहे. पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे नागरिकांनी त्यांना धन्यवाद देत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.