विरार : वसई पुर्वेकडील सातिवली येथील एका ऑफसेट प्रिंटीग कंपनीत काम करणार्या १६ वर्षीय तरुणीसोबत कंपनीच्याच मालकाने अमानुष कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी कंपनीच्या कार्यालयात आणि गच्चीवर ही घटना घडली असल्याचे पीडित तरुणीने बोलताना सांगितले. याप्रकरणी आरोपी विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
वसई पूर्वेकडील सातिवली या ठिकाणी असलेल्या ऑफसेट प्रिंटीग कंपनीचा मालक प्रदीप प्रजापती (५०) याने पीडित मुलीला तिच्या विरोधात तक्रार आहे असे सांगितले. त्यावर तोडगा काढण्याचे कारण सांगून कार्यालयात बोलावले आणि दुपारी साडेतीनच्या सुमारास तिच्यावर कार्यालयात बलात्कार केला. या प्रकरणाने पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. १ जानेवारी रोजी ती कामावर आली. संध्याकाळी सर्व कर्मचारी घरी गेल्यावर प्रजापती याने तिला मोठ्या सेठना तुला भेटायचे आहे असे सांगून थांबवून ठेवले. त्यानंतर तिला कंपनीच्या गच्चीवर नेले आणि पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. अखेर पीडित मुलीने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात आरोपी प्रदीप प्रजापती याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६५(१) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) च्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी आमच्याकडे घटना घडल्यानंतर आली होती. मात्र कंपनी बंद होती. आरोपी निष्पन्न झाला. सदर आरोपी याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी दिली.