विरार : वसई – विरार शहरातील विकासाच्यानावाखाली बांधण्यात आलेली आकाश मार्गिका आता बेवारस अवस्थेत पडली आहे. ही आकाश मार्गिका अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. त्याच बरोबर सुरक्षा रक्षक नसल्याने या मार्गिकांवर कुत्रे, चरसी गर्दुले, बेघरांनी आपले बस्तान मांडले आहे. यामुळे या मार्गिका सामान्य नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरू लागल्या आहेत. विरार परिसरात विरार पूर्वेकडून रेल्वे स्थानकात जाण्यासाठी अथवा पश्चिमेला जाण्यासाठी या आकाश मार्गिकेचा वापर केला जात होता. या मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी भिकार्यांनी आपले संसार थाटले आहेत. त्याच बरोबर रात्रीच्या वेळी या मार्गिकेवर चरसी गर्दुल्यांचा वावर वाढला आहे. या मार्गाच्या खालीच दोन्ही बाजूला दारूची दुकाने असल्याने अनेकवेळा मद्यपी दारू पिताना आढळून येत असतात. महत्त्वाची बाब म्हणजे दारूच्या बाटल्या मद्यपी यांच्याकडून फोडल्या जातात तसेच अनेक ठिकाणी या बॉटल्स पडून असल्याचे दिसून आले आहे. त्याच बरोबर खाल्लेले अन्न टाकले जात असल्याने कुत्र्यांचा वावर या ठिकाणी होत असतो. रहदारीच्या वेळी अनेक वेळा कुत्रे महिलांच्या अंगावर धावून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याच बरोबर प्रेमी युगलांनी तर या मार्गिंकेला हक्काचे स्थान बनविले आहे. या दोन्ही मार्गिकांवर सुरक्षा रक्षक नाहीत. यामुळे अनेक गैरप्रकार मार्गिकांवर राजरोसपणे सुरू आहेत.
आम्ही त्या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवतो आहे. त्वरित त्यांच्यावर कारवाई केली जाईल –
सुरेश गायकवाड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, विरार
देह विक्री करणार्या महिला राजरोसपणे त्या ठिकाणी उभ्या असतात. पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी आमची विनंती आहे. जेणे करून या सगळ्या गोष्टींवर आळा बसेल आणि सर्वसामान्य नागरिक या आकाश मार्गिकेचा ये-जा करण्यासाठी वापर करेल .
– स्थानिक नागरिक , वसई