वसई : वसई- विरार शहर महानगर पालिकेने ग्रामपंचायत काळापासूनच्या १८९ मालमत्ता पालिकेच्या नावावर झाल्या आहेत. महसूल विभागात सातबारा उतार्यावर या मालमत्तांवर पालिकेचे अधिकृत नाव असल्याचे समोर आले आहे. तर उर्वरित मालमत्तांच्या नोंदी करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी बोलताना दिली.
वसई- विरार महापालिकेची स्थापना ३ जुलै २००९ रोजी झाली. त्यापूर्वी वसई तालुक्यात ४ नगरपरिषदा आणि ५२ ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. महापालिका स्थापन झाली तेव्हा या सर्व ग्रामपंचायती आणि नगरपरिषदा महापालिकेत विलीन झाल्या होत्या. मात्र ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या मालमत्ता पालिकेच्या नावावर नव्हत्या. त्यात ग्रामपंचायतीची कार्यालये, समाजमंदिरे, विभागीय कार्यालये, विविध वास्तू, मैदाने, मोकळ्या जागा, रस्ते आदींचा समावेश होता.
त्यामुळे अनेकदा कायदेशीर अडचणी येत होत्या. सत्ता महापालिकेची मात्र मालमत्ता ग्रामपंचायतीची अशी परिस्थिती होती. एकूण २५१ मालमत्ता या ग्रामपंचायतीच्या नावावर होत्या. त्यामुळे मागील वर्षी पालिकेने मालमत्ता विभाग स्थापन केला होता. याशिवाय पालिकेने ५० भूखंड शोधले असून त्यांना कुंपण घालून ते संरक्षित केले आहेत. सर्व मालमत्ता शोधून त्यांच्या सातबारावर पालिकेचे नाव चढविण्यात आले आहेत. २८९ पैकी १५१ मालमत्तांची महसूल दप्तरी महापालिकेच्या नावाची नोंद करण्यात आली असून उर्वरित मालमत्तांच्या नोंदी करण्याचे काम सुरू आहे. या भूखंडांना कुंपण घालून ते देखील संरक्षित करण्यात येत असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
या भूखंडांची किंमत बाजारभावानुसार कोट्यवधींच्या घरात आहे. वसई -विरार महापालिका शहराचे एकूण ४२० हेक्टर क्षेत्रफळ आहे. पालिकेच्या मालकीच्या एकूण ८५२ मालमत्ता आहेत. याशिवाय त्यात राज्य शासन, गुरूचरण विभाग, तसेच ग्रामपंचायत आणि नगरपरिषदांच्या मालकीच्या जागा होत्या. पालिकेच्या स्थापनेनंतर ग्रामपंचायत आणि नगरपरिषदांच्या जागा महापालिकेच्या अखत्यारित आल्या होत्या. पण त्यांचे सातबारे उतारे पालिकेच्या नावावर हस्तांतरीत झाले नव्हते. पालिकेने अशा ६६ भूखंड सर्वेक्षणानंतर शोधून काढले आहेत. याशिवाय जिल्हाधिकार्यांकडून पालिकेला १४ भूखंड मिळाले आहेत. असे एकूण ५० भूखंड पालिकेला मिळाले आहेत.