विरार : वसई-विरार शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची अर्ज घेण्याची मुदत २८ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी महिला व बालकल्याण विभागातील विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांनी केले आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महानगरपालिका हद्यीतील गरीब व गरजूंना अनेक योजना मंजूर केल्या आहेत. यामध्ये विद्यावर्धीनी शैक्षणिक योजनेअंतर्गत विधवा, निराधार, घटस्फोटीत, परित्यक्ता महिलांच्या मुली व मुले, निराधार बालके, दिव्यांग, कर्णबधीर व मुकबधीर मुले व मुली, एच.आय.व्ही बाधीत पालकांच्या मुलांना, ज्या महिलेचे पती व्याधीग्रस्त असून अंथरुणास खिळलेले आहेत अशा महिलांच्या मुलांना तसेच अनाथ निराश्रीत बालकांना तसेच कोवीड-१९ मध्ये आई किंवा वडील मयत झालेल्या पालकांच्या मुले व मुलींना शैक्षणिक अर्थसहाय्य दिले जाते.
याचबरोबर आधारमाया योजनेअंतर्गत कुष्ठरोग बाधीत महिला, मुले व मुली तसेच ६० वर्षावरील एकाकी ज्येष्ठ महिलांच्या उपजिविकेकरिता मासिक अनुदान, उत्तरदायी योजनेअंतर्गत गतीमंद, मतिमंद मुलांच्या देखभालीकरीता मासिक अनुदान, सुखदायिनी योजनेअंतर्गत कुटुंब प्रमुख ७५ टक्के अथवा त्याहून अधिक दिव्यांग असणार्यांच्या १४ वर्षार्ंखालील मुलांना व सर्व वयोगटातील मुली व महिलांना मासिक अनुदान दिले जात आहे. महिलांना डायलेसीस उपचाराकरिता जिवनदायीनी योजनेअंतर्गत प्रति खेप आर्थिक सहाय्य व कर्करोग बाधीत महिलांच्या उपचाराकरीता देखील वैद्यकिय सहाय्य, महिलांना मेमोग्राफी तपासणीकरिता व पॅप स्मीअर तपासणीकरिता अर्थसहाय्य यामध्ये वरदायिनी योजनेअंतर्गत निराधार, विधवा महिलेच्या मुली व ज्या मुलींचे आई वडील दिव्यांग आहेत. त्या मुलीच्या तसेच अंध, अपंग मुली व अनाथ, निराधार मुलींच्या लग्नाकरिता आर्थिक अनुदान, त्याचबरोबर दत्तक योजनेअंतर्गत मुला-मुलींना दत्तक घेतल्यास देखील महानगरपालिकेमार्फत प्रोत्साहान पर आर्थिक सहाय्य देण्यात येते.
तसेच श्रमसाधना योजनेअंतर्गत ४५% ते ७५% दरम्यान अंधत्व व अपंगत्व असलेल्या महिलांना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य, १८ ते २१ वयोगटातील अनाथ मुलींना उपजिविकेसाठी अर्थसहाय्य देत आहे. या सर्व योजनांची महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत दैनंदिन अंमलबजावणी सुरू असून, याबाबतची नियमावली व लाभार्थी नमूना फॉर्म महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात (महिला व बालकल्याण विभागात) व महानगरपालिकेच्या www.vvcmc.in या वेबसाईट वर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.