वाडा: पालघर – वाडा – देवगांव – नाशिक हा राज्यमार्ग वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेतून गेला आहे. बाजारपेठेतील या रस्त्याच्या लगतच दुतर्फा व्यापारी वर्गाने दुकाने थाटली आहेत. त्यामध्ये आणखी भर म्हणजे बेशिस्त वाहन चालक नव्याने रुंदीकरण केलेल्या जागेवर तासनतास वाहने उभी करुन बाजारपेठेत खरेदीसाठी फिरत असतात. या बेशिस्त वाहन चालकांना पोलीसी खाक्या दाखविण्याची गरज आहे. या रस्त्यावर पादचार्यांनाही चालणे मुश्किल होऊन बसेल असे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे.
पालघर – वाडा – देवगांव – नाशिक हा राज्यमार्ग वाड्यातील खंडेश्वरी नाका ते परळी नाका या एक किलोमीटर लांबीच्या बाजारपेठेतून गेला आहे. दोन वर्षांपुर्वीच या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. रुंदीकरण करताना दुतर्फा गटारांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र येथील काही व्यापार्यांनी गटारावरच अर्धी अधिक दुकाने थाटली आहेत. तर रस्ता रुंदीकरण केलेल्या जागेवर काही बेशिस्त वाहन चालक दुचाकी, चारचाकी वाहने उभी करुन बाजारपेठेत खरेदीसाठी फिरत असतात. या बेशिस्त वाहन चालकांवर पोलीस विभाग, नगरपंचायत प्रशासन यांच्याकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने येथील वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथील नगरपंचायत प्रशासन, पोलीस यंत्रणा व लोकप्रतिनिधींना यश आलेले नाही. या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करणारे बसचालक आणि पादचारी प्रशासनाच्या या ढिल्या कारभारावर संताप व्यक्त करीत आहेत.
या रस्त्याच्या रंदीकरणानंतर येथील वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा येथील नागरिकांनी केली होती. मात्र रुंदीकरण केलेल्या जागेचा उपयोग वाहन चालकांनी वाहनतळ केल्याने येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे थे राहिला आहे. रस्त्यावर होणार्या या अनधिकृत वाहनतळा (पार्किंग) विरोधात येथील नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कुठलीही कारवाई करत नसल्याने येथील वाहतूक कोंडीत दररोज भर पडत आहे. या वाहतूक कोंडीचा त्रास अन्य वाहनचालकांना तर होतोच, पण रस्त्याच्या कडेला चालणार्या पादचार्यांना अधिक होत आहे.