बोईसर : हरित वाढवण बंदरासाठी लागणार्या पाण्याच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा परिपूर्ण आराखडा तयार झाला आहे. वाढवण बंदर पाणीपुरवठा योजना ही जवळपास ३२८ कोटींच्या घरात असून या योजनेला महाराष्ट्र जीवन प्रधिकरणामार्फत तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. योजनेच्या कामासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
डहाणू तालुक्यातील वाढवण समोरील समुद्रात हरित वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. बंदराच्या विविध टप्प्यांच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहेत. त्यातच बंदर उभारणीसाठी पाण्याची प्राथमिक आवश्यकता लक्षात घेऊन डहाणू तालुक्यातील सूर्या नदीतून गारगाव भागातून पाणी योजना प्रस्तावित होती. मात्र या योजनेला पाण्याचे आरक्षण न मिळाल्याने सुधारित योजनेनुसार कुर्झे धरणातून पाणी उचल करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार या धरणातून वाढवण बंदर प्रकल्प पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी आरक्षित करण्याला मान्यताही मिळाली आहे. सूर्या नदीवरून योजना प्रस्तावित होती. तेव्हा योजनेचा खर्च २२६ कोटींच्या जवळपास होता. मात्र आता पाणी कुझें धरणातून आणण्यात येणार असल्याने योजनेची किंमत अंदाजे ३२८ कोटी झाली. सुधारित योजनेचा आराखडा महाराष्ट्र जीवन प्रधिकरणामार्फत तयार करण्यात आला असून त्याला तांत्रिक मान्यता आहे. मात्र काही मान्यता प्रलंबित आहेत. सुधारित पाणीपुरवठा योजनेनुसार कुर्झे धरणातून १५.२३ दशलक्ष घनमीटर इतके पाणी आरक्षित करण्यात आले आहे. बंदरासाठी ६.१८ दलघमी तर बंदराच्या वसाहतीसाठी ९.५ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या आरक्षणाला जलसंधारण / जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. पाणीपपुरवठा योजनेचा सविस्तर सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. ३२८ कोटी रुपयांची ही योजना तयार असून यासाठी (ता. १६ सप्टेंबर २०२४) रोजी तिला तांत्रिक मान्यता देण्यात आली.
योजनेत समाविष्ट
वाढवण बंदर प्रकल्प पाणीपुरवठा योजनेंतर्गत कुर्झे धरण परिसरात जॅकवेल व पाणीभरण विहीर यासह मुख्य जोड वाहिनी व काही ठिकाणी लागणारे जोड पूल तसेच २३ दलघमी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, ब्रेक प्रेशर टँक, गुरुत्वाकर्षण आधारित योजनेतील काही यंत्रणा, पाणी उचल पंप, मोठी-लघु-मध्यम प्रकाराच्या पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन, जलवाहिनीसाठी छोटे बोगदे व जोड रस्ते असे भाग पाणीपुरवठा योजनेचे असणार आहेत. या कामासाठी (ता. १३ ) जानेवारी २०२५ पर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतर ठेकेदार निवडीचे व योजनेचे काम देण्याची निश्चिती विहित प्रक्रियेनुसार पार पाडली जाणार आहे.
योजनेच्या कामासाठी ६५ कोटी केले वर्ग
योजनेच्या कामासाठी लागणार्या आराखड्यासह इतर प्रशासकीय व तांत्रिक कामांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सामंजस्य करार करून त्या अंतर्गत ६५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता विभागीय प्राधिकरण कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. वनजमिनीतून जाणार्या जलवाहिनीच्या परवानगी प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. त्यासाठी मागणी करण्यात करण्यात आली आहे.
२२४ कोटी मंजूर निविदा (टेंडर प्रोसेस ) चालू आहे . कुर्झे धरणातून पाणीपुरवठा योजना निधी हा जवाहर नेहरू पोर्टने निधी उपलब्ध करून दिला आहे . १३४.४२ कोटी रु. निविदा प्रक्रिया महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून प्रगतीत आहे . पहिला टप्पा चालू झाला आहे.
– अजय मूल्ये – कार्यकारी अभियंता,
प्रत्यक्षात पूर्व- पश्चिम भागातील शेतकर्यांना दुबार शेतीसाठी पाणी मिळत नाही.गेली अनेक वर्षे शेतकर्यांची मागणी प्रलंबित आहे. तसेच मार्च महिन्यानंतर प्रचंड पाण्याचा तुटवडा भासतो. अधिकचा पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. पाण्याविना अशा बिकट परिस्थितीत सरकार इथल्या भूमिपुत्रांना मारण्याचा घाट घालत आहे.
मिलींद राऊत , अध्यक्ष, वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती