तारापूर एमआयडीसीतील रस्त्यांची युद्ध पातळीवर दुरूस्ती

एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मालाची ने-आण करणारी अवजड वाहने,कामगार वर्ग आणि प्रवासी यांना खड्डे आणि धुळीतून प्रवास करावा लागत होता.खराब रस्त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अनेक वेळा अपघात होऊन जिवीतहानी होत होती.

बोईसर : जागोजागी पडलेले खड्डे आणि धूळ यामुळे प्रचंड मनस्ताप सहन कराव्या लागणार्‍या वाहन चालक,प्रवासी आणि कामगारांना तारापूर एमआयडीसीतील रस्त्यांची युद्ध पातळीवर दुरूस्ती व डांबरीकरण सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तारापूर एमआयडीसी मधील बोईसर-नवापूर रस्त्यावरील धोडीपूजा,अवधनगर परिसर,मुकुट टँक पेट्रोल पंप ते कोळवडे आणि अंतर्गत रस्त्यांची पाऊस आणि नियमीत देखभाल-दुरूस्ती अभावी प्रचंड वाताहात झाली होती.मागील पाच-सहा वर्षे या रस्त्यांची डांबरीकरण न झाल्याने जागोजागी खड्डे पडून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते.एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मालाची ने-आण करणारी अवजड वाहने,कामगार वर्ग आणि प्रवासी यांना खड्डे आणि धुळीतून प्रवास करावा लागत होता.खराब रस्त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अनेक वेळा अपघात होऊन जिवीतहानी होत होती.

तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणार्‍या बोईसर ते नवापूर १.८ किमी लांबीच्या खड्डेमय रस्त्याची दुरूस्ती आणि डांबरीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे.एमआयडीसीचे उपअभियंता मुकेश लांजेवार यांनी अग्रक्रमाने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून दुरूस्ती आणि डांबरीकरण यासाठी ६.१७ कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे.याच सोबत औद्योगिक वसाहतीमधील मुकुट टँक पेट्रोल पंप ते कोलवडे-कुंभवली या गावांकडे जाणार्‍या खराब रस्त्याचे तसेच धोडीपूजा गावातील अंतर्गत रस्त्याचे देखील डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तारापूर एमआयडीसीमधील आणि परिसरातील रस्ते,पथदिवे,हायमास्ट,प्रमुख चौकांचे सुशोभीकरण,अमेय पार्क येथील बॉक्स शेल पूल,ट्रक टर्मिनल ही कामे मंजूर करण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी आणि या भागाच्या जिल्हा परिषद सदस्या पूर्णिमा धोडी यांच्याकडून एमआयडीसी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

मुकेश लांजेवार यांची जून २०२२ ला तारापूर एमआयडीसीच्या ड्रेनेज विभागाच्या उप अभियंतापदी नेमणूक होताच अवघ्या ८ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावायला सुरवात केली आहे.एमआयडीसीच्या अखत्यारीतील जागा आणि रस्त्यांच्या दुतर्फा अतिक्रमण केलेल्या अनधिकृत बांधकामे,झोपड्या आणि टपर्‍या यांच्यावर तोडक कारवाई करीत परिसर मोकळा केला.