वाडा: तालुक्यातील खरीवली तर्फे कोहोज येथील दगडखाण मालकांनी दगडखाणीतील पाणी शेतकर्यांच्या थेट शेतात सोडल्याने कापून ठेवलेल्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. गोपाळ अधिकारी, सुरेश भोईर,अरूणा भोईर आणि सदाशिव अधिकारी अशी नुकसान झालेल्या शेतक-यांची नावे आहेत.
तालुक्यातील खरीवली तर्फे कोहोज या गावालगत अनेक दगडखाणी आहेत. या खदाणीत पावसाचे पाणी भरून दगडखाणी तुडूंब भरल्या होत्या. आता पाऊस गेल्याने दगड उत्खननाचे काम सुरू करण्यासाठी येथील दगडखाण मालकांनी आपल्या खदाणीतील पाणी मोटार लावून खाली करण्यास घेतले आहे.मात्र याच वेळेस खाणीला लागूनच शेतकर्यांच्या जमिनी असून या शेतजमिनीत हे पाणी रात्रीच्या सुमारास सोडले आहे,असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. शेतकर्यांनी याचवेळी भातपिक कापले असून शेतात पाणी गेल्याने कापून ठेवलेल्या भातपिकाची नुकसान झाले आहे. दरम्यान,खरीवली गावच्या पोलीस पाटील शितल पाटील यांनीही ग्रामस्थांसह गोपाल अधिकारी या शेतकर्याच्या शेतात जाऊन पंचनामा केला आहे.पंचनाम्यात त्यांनी दगडखाणीतील पाणी शेतात सोडल्याने सर्वत्र पाणी होऊन नुकसान झाल्याचे म्हटले आहे.दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दगडखाण मालकावर कायदेशीर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी गोपाळ अधिकारी या शेतकर्याने केली आहे.