डहाणू : पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवरील कवडास आणि धामणी धरणांतून उन्हाळी हंगामात शेतीसाठी पाणीपुरवठा करणार्या सूर्या कालव्याचा पाणीपुरवठा यावर्षी दुरूस्तीच्या कारणासाठी बंद करण्यात येणार आहे. यासंदर्भात लघुपाटबंधारे विभागाने डहाणू आणि पालघर तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींना लेखी पत्र दिले आहे.उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग मनोर यांनी ही माहिती लेखी स्वरूपात ग्रामपंचायतींना पाठवली असून त्यांनी शेतकर्यांपर्यंतही बाब पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.या दुरूस्तीचा परिणाम काही गावांवर होणार आहे.
सूर्या डावा आणि उजवा तीर कालव्यांच्या माध्यमातून डहाणू व पालघर तालुक्यातील वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे, कासा, तवा, धामटणे, पेठ, कोल्हाण, आंबेदे, ब-हाणपूर, नानीवली, रावते, चिंचारे, बोरशेती, थेरोंडा, सोनाळे, चारोटी, सारणी, रानशेत, उर्से, म्हसाड आदी गावांतील शेतजमिनींना उन्हाळी भात आणि भाजीपाल्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्र या पाण्यामुळे ओलीताखाली येते.
गेल्या अनेक वर्षांपासून सूर्या कालव्यांची दुरुस्ती न झाल्याने ठिकठिकाणी गळती होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते, परिणामी कालव्याच्या शेवटच्या टोकांवरील शेतकर्यांना पाणी मिळत नाही. या संदर्भात स्थानिक प्रतिनिधींनी आणि शेतकर्यांनी वेळोवेळी उपाययोजना करण्याची मागणी केली होती.पाणी गळती थांबवण्यासाठी पाईप मोर्यांची दुरुस्ती, गेट पुनर्बांधणी, अस्तरीकरण दुरुस्ती, साचलेली माती काढणे आणि कालव्यांची साफसफाई यांसारखी कामे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ही कामे नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे कठीण असल्याने २०२४-२५ च्या उन्हाळी हंगामासाठी सिंचनासाठी पाणी सोडता येणार नाही, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
पाट बंधारे विभागाकडून पाटाची दुरुस्ती ही अगोदरच होणे अपेक्षित होती. यंदाचा परतीचा पावसाने शेतीचे अत्यंत नुकसान झाले होते. त्यामुळे उन्हाळी शेतीवर पूर्णपणे अवलंबून होतो. मात्र यावर्षी पाटाच्या पाण्या अभावी शेतकर्यांचे खूप नुकसान होणार आहे.
– सुदाम कदम , शेतकरी.
“दरवर्षी डावा आणि उजवा तिर कालव्याची गळती होत असल्या कारणाने शेतकर्यांकडून दरवर्षी पाटाच्या दुरुस्तीची मागणीची शेतकर्याकडून जोर धरत होती. त्या अनुषंगाने उजवा तिर कालवा पाटाच्या दुरुस्तीची सुरुवात केली असून या संदर्भात वाघाडी , कासा, भराड या ग्रामपंचायत कार्यालयीन सूचना पत्र दिले आहे. मात्र इतर ग्रामपंचायत क्षेत्रात उजवा तिर कालव्याद्वारे पाणी चालू राहील.
– प्रवीण भुसारा , कार्यकारी अभियंता, पाट बंधारे विभाग