घरपालघरविद्युत बिल न भरल्याने करवाळे धरणाचा पाणीपुरवठा बंद

विद्युत बिल न भरल्याने करवाळे धरणाचा पाणीपुरवठा बंद

Subscribe

मात्र, त्यानंतर त्यांना विसर पडल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सफाळे: पालघर तालुक्यातील सफाळे करवाळे धरणाचा विद्युत पुरवठा थकित वीजबिल न भरल्याने चार दिवसांपासून महावितरण विभागाकडून बंद करण्यात आला आहे. या धरणातून सफाळे सह 17 गावांना पाणीपुरवठा होत असून नियमित बिजबिल न भरल्याने थकित बिलाची एकूण रक्कम 15 लाखांवर गेली. दरम्यान, खासदार राजेंद्र गावित यांनी काही महिन्यांपूर्वी थकित बिलातील 6 लाखांची रक्कम भरण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर त्यांना विसर पडल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

करवाळे धरणातून सफाळे, कर्दळपाडा, माकणे, विराथन खुर्द, मांडे, जलसार, विराथन बुद्रुक, टेंभिखोडवे, रामबाग, माकुणसार, आगरवाडी इत्यादी 17 गावांना पाणीपुरवठा होतो. मात्र, गेल्या काही वर्षापासून केवळ काहीच ग्रामपंचायती नियमित विजबिलाची रक्कम भरत असल्याने उरलेल्या थकित बिलाची रक्कम आणि त्यावरील व्याजाचा बोजा वाढतच होता. अशात पूर्ण बिल न भरल्याने महावितरण विभागाला वारंवार वीजपुरवठा खंडित करावा लागत होता.
दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा परिषद सदस्य मनीषा निमकर तसेच उंबरपाडा – सफाळे ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेश (बंटी) म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन वेळोवेळी थकित बिलापैकी काही रक्कम भरून त्या – त्या वेळी वीजपुरवठा सुरळीत करून घेतला होता. सध्या थकित वीजबिलातील एकूण मुद्दल 10 लाख इतकी असून आजवरील थकित बिलाच्या व्याजाची रक्कम 5 लाख रुपये अशी एकूण 15 लाखांची थकित विजबीलाची रक्कम असल्याची माहिती मिळाली आहे. तर विजबिल भरण्यासाठी कुठल्याही ग्रामपंचायतने पुढाकार न दर्शविल्याने अखेर विद्युत पुरवठा खंडित करून 17 गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असल्याचे महावितरण कंपनीच्या सफाळे विभागाचे अधिकारी बैतुले यांनी सांगितले. तर यासंदर्भात पालघरचे गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडेकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -