विरारमध्ये विद्युत पंप लावून पाणीचोरी

या तक्रारीनंतर आयुक्त अनिलकुमार पवार यांनी जलवाहिनी खंडित करण्यासोबत ही चोरी करण्यास प्रोत्साहन देणार्‍या कर्मचार्‍यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

वसईः विरारमधील मनवेलपाडा भागात अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असताना या भागातील दत्त मंदिरजवळील भारती अपार्टमेंटमध्ये पाणी चोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या इमारतीला दोन कनेक्शन असून या दोन्ही कनेक्शनना मोटर लावण्यात येत असल्याने परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार होती. ही कल्पना वॉलमन व इंजिनिअरला असतानाही कारवाई होत नसल्याने मनवेल पाडा-गावातील ग्रामस्थांनी रविवारी सकाळी ही पाणी चोरी रंगेहाथ पकडली. या तक्रारीनंतर आयुक्त अनिलकुमार पवार यांनी जलवाहिनी खंडित करण्यासोबत ही चोरी करण्यास प्रोत्साहन देणार्‍या कर्मचार्‍यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

वसई-विरार महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत २८ जून २०२० रोजी संपली होती. त्यानंतर महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे. आजपर्यंत वसई-विरार महापालिकेची निवडणूक झालेली नाही. याचे परिणाम नागरिकांच्या सोयी सुविधांवर होत आहेत. प्रशासकीय कारभारामुळे अधिकारी मनमर्जीने वागत असल्याने नागरिकांच्या सुखसोयींत बाधा येत आहेत. मागील दोन-अडीच वर्षांच्या प्रशासकीय काळात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना शहराला मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महापालिकेकडून अनेक इमारतींना परवानग्या दिल्या जात आहेत. तब्बल २२ मजल्यांच्या इमारती शहरात उभ्या राहिल्या आहेत. मात्र यातील बहुतांश इमारती आजही पाण्यासाठी पालिकेसोबत झुंजत आहेत. या इमारतींना पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने अद्याप तरी कोणतेही नियोजन केलेले नाही. याचे परिणाम म्हणून दोन वर्षांच्या प्रशासकीय काळात विरार-मनवेलपाडा भागात अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महिलावर्गाला मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत कित्येकवेळा संबंधित अधिकारी, इंजीनियर यांच्यासोबत बैठका घेण्यात आलेल्या होत्या. या बैठकांनंतर तात्पुरती उपाययोजना केली जाते. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे होते, असा नागरिकांचा आरोप आहे. सामान्य नागरिकांना अपुरा पाणी पुरवठा होत असताना काही आस्थापना व सोसायटी मोटर लावून पाणीचोरी करत असल्याने वसई-विरारमधील सर्वच राजकीय पक्षांनी या विरोधात आवाज उठवला होता.

त्यांनतर आयुक्त अनिलकुमार पवार यांनी तातडीचे आदेश देत शहरातील अनधिकृत जलवाहिनी अधिकृत करून घेण्याच्या सूचना सोसायट्यांना केल्या होत्या. अन्यथा सोसायटी अध्यक्षाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आयुक्तांच्या या सूचनांना सर्वांनीच केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे आयुक्तांनी स्वतः जातीने सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली होती. शिवाय शहरातील मीटर लावून पाणी चोरी करणार्‍या आस्थापना व सोसायटीविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही ही पाणी चोरी थांबलेली नसल्याचे विरार-मनवेल पाडा येथील दत्त अपार्टमेंटमधील पाणीचोरीने सिद्ध केले आहे. या पाणी चोरीची कल्पना प्रभाग समिती ’ब’चे पाणीपुरवठा अभियंता सागर पवार, वॉलमन रवी पाटील, मनीष सामंत यांना असल्याने त्यांना निलंबित करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. सोसायटीची जलवाहिनी खंडित करून पदाधिकार्‍यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. हा जनरेटा लक्षात घेऊन आयुक्त अनिकुमार पवार यांनीही कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.