घरपालघरबोईसर मनोर सफाळे येथील आठवडी बाजार बंद

बोईसर मनोर सफाळे येथील आठवडी बाजार बंद

Subscribe

पालघर नगरपरिषदेची कारवाई

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव व संसर्ग रोखण्याकरता पालघर तालुक्यातील बोईसर ,मनोर सफाळे येथील आठवडी बाजार 25 फेब्रुवारीपासून पुढील आदेश होईपर्यत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हादंडाधिकारी पालघर यांनी दिले आहेत. शुक्रवारी पालघर नगरपरिषदेने आपल्या हद्दीत भरलेल्या आठवडी बाजारावर कारवाई केली.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात लोकांनी येऊ नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेमध्ये अधिकाधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, थांबू नये, चर्चा करणे तसेच काही कार्यक्रमांचे आयोजन केल्यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेत सर्व सामान्य जनतेस व त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच नियंत्रण आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना गर्दी टाळणे गरजेचे असल्यामुळे पालघर तालुक्यातील पालघर, बोईसर, मनोर, सफाळे येथील आठवडी बाजार बंद करणेकामी योग्य तो आदेशाची शिफारस उपविभागीय अधिकार्‍यांनी केली होती.

कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहाता, सदर विषाणुची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेता पालघर तालुक्यातील पालघर, बोईसर, मनोर, सफाळे येथील आठवडी बाजार २५ फेब्रुवारीपासून पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, पालघर येथे शुक्रवारच्या आठवडी बाजाराच्या एकदिवस आधी गुरुवारी अचानक लावण्यात आलेल्या बंदीमुळे आठवडी बाजारात जवळपासच्या गावातील येणार्‍या भाजीपाला, मासळी, सुक्की मासळी आदी विकणार्‍यांची चांगली तारांबळ पहायला मिळाली. आपले उत्पन्न आठवड्याच्या शुक्रवारच्या बाजारात विकून परिवारांचे उदरनिर्वाह करणार्‍या स्थानिक लोकांना आधीच लोकडाऊनचा मोठा फटका बसलेला आहे. त्यातून बाहेर निघून हळूहळू सावरत त्यांची आर्थिक परिस्थितीत सुधार येत असताना आता आठवडी बाजारावर बंदी असल्याकारणाने त्यांना आपलें सामान परत घेऊन जाण्यासाठीसुद्धा पुरेश्या गाडीभाडे नसल्याचे एका सुक्की मासळी विकणार्‍या महिलेने आपलं महानगरशी बोलताना आपला दुख व्यक्त केले.

- Advertisement -

मच्छीमार व आदिवासी महिला या आठवडी बाजारात आपली उत्पन्ने विकत होते त्यांना या अचानक घेण्यात आलेल्या आठवडी बाजार बंदचा निर्णयामुळे एवढा मोठा धक्का बसला आहे. दुसर्‍यांकडून कर्ज घेऊन विकत आणलेल्या मालाचे आता करायचें काय, घरी जाऊन घेतलेले कर्ज कसे फेडायचें अशा चिंतेत विक्रेते दिसून आले. पालघर आदिवासीबहुल जिल्हा असून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आपल्या रोजच्या वापरासाठी लागणार्‍या वस्तूच्या खरेदीसाठी आठवडी बाजारावर अवलंबून असतात.

भाजी, मच्छी आदी नाशिवंत पदार्थ आहेत. त्यामुळे प्रशासनाने दोन दिवस आधी तरी सूचना द्यायला हव्या होत्या. तसेच शहरातील मॉलमध्ये कोरोना वाढणार नाही का ?. तेथेही गर्दी असतेच ना. संबंधित प्रशासनाशी बोलून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.
– दिनेश गवई, सचिव, मनसे पालघर जिल्हा

- Advertisement -

शासन आदेश असल्यामुळे आम्ही त्याची अंमलबजावणी करीत आहोत.
– उमाकांत पाटील, आरोग्य अधिकारी, पालघर नगरपरिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -