विरारची हवा काय म्हणतेय ?  आरटीओचे स्वच्छ वायू सर्व्हेक्षण

उपाययोजना व संकल्पना याबाबत केंद्र सरकारने महापालिकेला विचारणा केलेली आहे. त्या संदर्भातील अहवालही केंद्र सरकारने पालिकेला सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

वसईः केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत विरार उपप्रादेशिक परिवहन विभागाने ’स्वच्छ वायू सर्व्हेक्षण 2022’ केले असून वातावरणात होणारे वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी ’पीयूसी सेंटर’च्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत वसई-विरार महापालिकेला निधी प्राप्त होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत स्वच्छ भारत अभियान व शहर सौंदर्यीकरणाकरता वसई-विरार महापालिका व अन्य आस्थापनांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपाययोजना व संकल्पना याबाबत केंद्र सरकारने महापालिकेला विचारणा केलेली आहे. त्या संदर्भातील अहवालही केंद्र सरकारने पालिकेला सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

या अनुषंगाने वसई-विरार महापालिकेने उपप्रादेशिक परिवहन विभागाला पत्राद्वारे वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मागितली होती. या पत्राला उत्तर देताना उपप्रादेशिक परिवहन विभागाने ’स्वच्छ वायू सर्व्हेक्षण 2022’अंतर्गत माहिती सादर केली आहे. या माहितीत वसई-विरार शहरात 7 लाख 68 हजार 328 इतकी वाहने असून; त्यातून होणारे वायू उत्सजर्न 118 पीयूसी सेंटरच्या माध्यमातून नियंत्रित करण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाने म्हटले आहे. ही सर्वच्या सर्व पीयूसी सेंटर ’सर्व्हर कनेक्टेड’ असून; प्रत्येक वाहन पीयूसी सर्टिफाइड असल्याचे आरटीओने म्हटले आहे.

परिवहन विभागाचा आकडा कमी ?

वसई-विरार शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या जवळपास आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने मात्र ही लोकसंख्या 13 लाख 58 हजार 686 इतकी गृहीत धरली आहे. त्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत केवळ 112 बस उपलब्ध आहेत. प्रति एक लाख लोकसंख्येमागे ही बस संख्या 8.24 इतकी आहे. दरम्यान; उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या एकूण 7 लाख 68 हजार 328 इतक्या वाहन संख्येत ई-मोबॅलिटी म्हणजेच ई-बसेस, दुचाकी, तीनचाकी व चारचाकी यांची संख्या अवघी 3 हजार 962 इतकी आहे. टक्केवारीत ही संख्या 0.52 इतकी आहे. विशेष म्हणजे शहर सौंदर्यीकरणांतर्गत वसई-विरार महापालिका परिवहन विभागाच्या माध्यमातून लवकरच शहरातील बस स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतून देण्यात आली आहे.