घरपालघरअशा मृत्यूला जबाबदार कोण? विरारमधील दुर्दैवी घटना समोर

अशा मृत्यूला जबाबदार कोण? विरारमधील दुर्दैवी घटना समोर

Subscribe

कृष्णा मथुरा नगरसमोरील मुख्य रस्त्याखाली असलेली महावितरणची केबल ब्रेक झाल्याने पाण्यात विजेचा प्रवाह सुरू होता. तनिष्का याचठिकाणी जात असतानाच तिला विजेचा जबरदस्त शॉक लागला.

वसईः क्लासमधून घरी परत येत असताना पावसामुळे साचलेल्या पाण्यातून जाणार्‍या एका शालेय विद्यार्थींना विजेचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना विरारजवळील बोळींज येथे मंगळवारी संध्याकाळी घडली आहे. तनिष्का लक्ष्मण कांबळे (१५) असे तिचे नाव असून ती दहावीत शिकत होती. मंगळवारी दिवसभर वसई विरार परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे अनेक भागात पाणी साचून राहिले होते. तनिष्का संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास क्लासमधून घरी जात होती. कृष्णा मथुरा नगरसमोरील मुख्य रस्त्याखाली असलेली महावितरणची केबल ब्रेक झाल्याने पाण्यात विजेचा प्रवाह सुरू होता. तनिष्का याचठिकाणी जात असतानाच तिला विजेचा जबरदस्त शॉक लागला. त्यातच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दोषी अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

- Advertisement -

तनिष्का कांबळे ही विद्यार्थिनी महापालिका व महावितरण प्रशासनाच्या ‘धक्कादायक कारभाराचा बळी ठरली आहे. विरार पश्चिमबोळींज येथील दुर्घटनेनंतर या दोघांचाही कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या घटनेतील दोषी अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व कांबळे कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्या, अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख संजय राऊत यांनी केली आहे. या मागणीसाठी शिवसैनिकांसह परिसरातील शेकडो रहिवाशांनी याठिकाणी उपस्थित राहून अधिकार्‍यांना धारेवर धरले. त्याआधी आणखी काही पादचार्‍यांनाही अशाचप्रकारे या ठिकाणी विजेचा धक्का जाणवल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. बुधवारी सकाळी महावितरणने याठिकाणचा वीजप्रवाह बंद करून खंडित वीजप्रवाहाचा शोध सुरू केला आहे. मात्र महावितरणने केलेल्या खोदकामात ‘धक्कादायक उलगडा झाला आहे. महावितरणने ठेकेदारामार्फत पाच ते सहा वर्षांपूर्वी रस्ता खोदून वीजवाहिनी केबल टाकली होती. नियमानुसार, किमान तीन फूट खोल खोदून ही केबल टाकणे अपेक्षित असताना ही केबल अवघ्या अर्ध्या फुटावर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वीज खंडित होऊन साचलेल्या पाण्यात वीज प्रवाह उतरला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृत्यू विजेच्या धक्क्यानेच

- Advertisement -

विशेष म्हणजे तनिष्काच्या शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू विजेच्या धक्क्यानेच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी मात्र महापालिकेकडे बोट दाखवले आहे. वसईविरार महापालिकेने याठिकाणी केलेल्या कामादरम्यान केबलला हानी पोहोचली असल्यानेच ही घटना घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. विद्युत निरीक्षक पालघर यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, याबाबतचा अहवाल त्यांच्याकडून दोन दिवसांत देण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेतील दोषी अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व कांबळे कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्या, अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख संजय राऊत यांनी केली आहे.

पालिकामहावितरणचे दुर्लक्ष

विरार पश्चिमबोळींज येथील मुख्य मार्गावरच हा अपघात घडला आहे. या ठिकाणी पावसाळ्यात दरवर्षी पाणी साचते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या पाण्याचा निचरा करण्याकरता तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी सातत्याने पालिकेकडे केलेली होती, मात्र पालिकेने याबाबत कोणतीही पावले उचलली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर उघडे डीपी, जागोजागी लोंबकळणार्‍या वीजतारा आणि जळणारे ट्रान्सफॉर्मर याबाबत सातत्याने तक्रारी करूनही महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी दखल घेत नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे. वर्दळीच्या रस्त्यांवरून आणि जमिनीखालून या वीजतारा जात असल्याने वीज तार तुटून किंवा वीज खंडित होऊन अपघात होण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊनच नागरिक अनेकदा महावितरणकडे याबाबत तक्रारी करत असतात. मात्र महापालिका अधिकारी आणि कर्मचारी या तक्रारींची दखल घेताना दिसत नाहीत, अशी तक्रार शिवसेना उपतालुका प्रमुख संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेना आक्रमक

विरार पश्चिमबोळींज येथील ब्रॉल सोसायटीत राहणार्‍या तनिष्का कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर वसई शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वसई शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात दोषी अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या शिष्टमंडळात वसई विधानसभा संघटक विनायक निकम, माजी गटनेत्या किरण चेंदवणकर, तालुकाप्रमुख स्वप्नील बांदेकर, तालुकाप्रमुख राजाराम बाबर, उपतालुका संघटक अनिता राणे, नवघर माणिकपूर शहर संघटक जसिंता फिंच यांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -