Homeपालघरwildfires : डोंगराला रोज लागतात वणवे, वनसंपदा धोक्यात..!

wildfires : डोंगराला रोज लागतात वणवे, वनसंपदा धोक्यात..!

Subscribe

वसई तालुक्यातील मोठ मोठ्या डोंगरांना आगी लागण्याच्या घटनांचे प्रमाण वाढत चालेल असून यात निसर्ग निर्मित वनस्पतींचा मोठा र्‍हास होत असल्याचे दिसून येत आहे.

मनोज तांबे, विरार : वसई -विरार भागातील अनेक छोट्या- मोठ्या डोंगरांना आगी लागल्याच्या घटना गेल्या दोन आठवड्यांपासून घडत आहेत. यामुळे आगीत वन संपदा नष्ट होत असून आगीच्या भडक्यात मुक्या प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती तेथील ग्रामस्थांनी आपलं महानगर शी बोलताना दिली. तर आगी लावणार्‍या नागरिकांवर प्रशासनाने कारवाई करावी ,अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

वसई तालुक्यातील मोठ मोठ्या डोंगरांना आगी लागण्याच्या घटनांचे प्रमाण वाढत चालेल असून यात निसर्ग निर्मित वनस्पतींचा मोठा र्‍हास होत असल्याचे दिसून येत आहे. यात हजारो वन्य जीव प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगी लागल्यामुळे अनेक प्रजातींचे प्राणी,पक्षी डोंगर सोडून दुसर्‍या डोंगरावर पलायन करतात. तर काही पक्षांची घरटी या आगीत जळून खाक झाली आहेत. वसई -विरार महामार्गालगत असणारे कणेर,जीवदानी डोंगर, कुंभारपाडा, वैतरणा परिसरातील दहिसर- कसरळी रोडवरील डोंगर, मांडवी – चांदीप परिसरातील तुंगारेश्वर डोंगर या ठिकाणी आग लागली होती. डोंगराला आग लागल्यामुळे औषधी वनस्पती नष्ट होत चालल्या आहेत. डोंगरावरील चारा, गवत जळून गेल्याने गुरे- ढोरे ,बकर्‍या, पशु- पक्षी यांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही डोंगरावर सध्या करवंदे, काजू, फुले- फळे, कंदमुळे, मधाचे पोळे, हेही नष्ट होत असल्याने आदिवासी कष्टकरी मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जी डोंगराला आग लागली होती ती आग आपण अधिकार्‍यांच्या मदतीने विझवण्यात आली आहे. तसेच संबंधित आरोपींविरोधात गुन्हा देखील दाखल केलेला आहे. डोंगराला आग लावणे हा योग्य प्रकार नाही. त्यामुळे अनेक औषधी वनस्पती या आकुंचन पावतात तसेच पशु, प्राणी यांचे जीवन देखील उध्वस्त होते. फिरत्या जनावरांचा चारा हा जळून खाक होतो. नागरिकांनी असे कृत्य करणे टाळावे, असे आवाहन वन अधिकारी संदीप चौरे यांनी केले आहे.

- Advertisement -

गेल्या दोन आठवड्यापासून डोंगरांना आगी लागण्याच्या घटना घडत आहेत .यामुळे हिंसक असणारे प्राणी गावात येत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओला- सुका कचरा जळून गेल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा जाऊन दोन ते तीन महिने झाले आहेत .यामुळे आता चार्‍याचा प्रश्न मार्गी कसा लावणार असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे.


Edited By Roshan Chinchwalkar

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -