घरपालघरआरक्षित जागेवर एसटी स्टँड, आगार विकसित करणार - अनिल परब

आरक्षित जागेवर एसटी स्टँड, आगार विकसित करणार – अनिल परब

Subscribe

आरक्षित जागेवर लवकरात लवकर एसटी स्टँड व आगार उभारण्याची कारवाई करण्याचे आदेश मंत्री अनिल परब यांनी संबंधित परिवहन विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.

  मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाईंदर पश्चिम येथील पालिकेच्या मंजूर विकास योजनेत मौजे भाईंदर सर्व्हे क्र. ३३८, ३३९ पै या आरक्षण क्र. ५७ (एसटी स्टँड व आगारा) चे आरक्षण असून या जागेचे एकूण क्षेत्र ४९ हजार चौरस मीटर एवढे आहे. ही जागा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताब्यात आहे. त्यातील बहुतांश जागा कांदळवनाने व्यापलेली आहे. या जागेत अहोरात्र शहरातील खासगी बसेस, डंपर, ट्रक उभ्या राहतात. त्यामुळे या जागेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. याठिकाणी लवकरात लवकर एसटी स्टँड व एसटी आगार उभारण्याची प्रक्रिया चालू करण्याची मागणी आमदार गीता जैन यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने बुधवारी परिवहन मंत्री यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात एक बैठक आयोजित केली होती.
यावेळी आमदार गीता जैन यांनी उपरोक्त ठिकाणी लवकरात लवकर एसटी स्टँड व आगार उभारून जागेचा होणारा गैरवापर थांबवण्याबाबतची विनंती मंत्री अनिल परब यांना केली. तसेच एसटी आगार विकसित केल्यावर याठिकाणी मिरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस तसेच मुंबई महापालिका आणि ठाणे व इतर शहरातील मिरा भाईंदर शहरात येणाऱ्या परिवहन सेवेच्या गाड्या उभ्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणीही आमदार जैन यांनी केली. या आरक्षित जागेवर लवकरात लवकर एसटी स्टँड व आगार उभारण्याची कारवाई करण्याचे आदेश मंत्री अनिल परब यांनी संबंधित परिवहन विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
त्याचप्रमाणे ही जागा बहुउद्देशीय व्यवसायिक कामाकरता वापरण्यासाठी बांधावयाच्या इमारतीला वन विभागाकडून मान्यता मिळावी. यासाठी राज्य परिवहन महामंडळ आणि मिरा भाईंदर महापालिका या दोघांनी एकमेकांच्या समन्वयाने पाठपुरावा करण्याचे आदेशही संबंधित विभागाला दिले. या बैठकीला अप्पर मुख्य सचिव, परिवहन विभाग, मंत्रालय, तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, पालिका आयुक्त दिलीप ढोले, दिपक खांबित, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरा भाईंदर महापालिका व इतर संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -