डहाणूः वाढवण बंदर रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी जीव गेला तरी चालेल ,असा निर्धार वाढवण येथे झालेल्या वाढवण विरोधी संघर्ष समितीच्या एल्गार सभेत व्यक्त करण्यात आला. डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने वाढवण बंदरासाठी सरकारला मार्ग मोकळा करून दिल्याने वाढवण बंदराविरोधात पालघर जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. वाढवण बंदर कुठल्याही परिस्थिती होऊ द्यायचे नाही, असा निर्धार रविवारी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने घेतलेल्या सभेत व्यक्त करण्यात आला. यासभेच्या प्रारंभी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी नारळ वाढवून एल्गार केला. यावेळी वाढवणविरोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने न्यायालयीन लढाईबरोबरच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरून मोर्चे, आंदोलन, रास्ता रोको अशा विविध मार्गाने आंदोलने करण्याचा निर्णय सभेत जाहिर करण्यात आला.
प्रभू रामचंद्राच्या पावन भूमीत आपण सर्व जमलेलो आहोत. आपल्याला आलेल्या संकटाची जाणीव करून देतात. गेल्या 25 वर्षांपासून ही लढाई सुरू आहे आणि यासाठी अनेकवेळा रस्त्यावर सुद्धा आपण उतरलो आहोत. 1998 मध्ये एक लाखाचा मोर्चा सुद्धा काढला होता. अनेक निदर्शने मोर्चे झाले. पण, या सरकारला काही जाग येईना. या बंदरामुळे मच्छीमारी मच्छीमार देशोधडीला लागणार आहे, असा आरोप समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी यावेळी बोलताना केला. यावेळी येथील प्रस्तावित वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी एल्गार सभेत समुद्र बचाओ मंचाचे भूषण भोईर, सागर कन्या मंचच्या समीक्षा गोवारी, जन आंदोलन समितीचे संजय मंगो, युवा समितीचे मिलिंद राऊत, अखिल भारतीय मच्छीमार संघाचे देवेंद्र तांडेल, डॉ. सुनील पर्हाड,सत्यजित चव्हाण यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.