जव्हार येथील प्रस्तावित मेडीकल कॉलेज पालघरला?

सरकारला जर खर्‍या अर्थाने आदिवासींचा उत्कर्ष करायचा असेल हे मेडीकल कॉलेज जव्हार येथेच व्हायला हवे, अशी मागणी स्थानिक आमदार सुनिल भुसारा यांनी केली आहे.

मोखाडा : आदिवासींच्या विकासासाठी खर्‍या अर्थाने जव्हार हेच जिल्ह्याचे ठिकाण असायला हवे होते. मात्र नोकरशहाच्या सोयीसाठी पालघर जिल्हा झाला .मात्र त्यानंतर येथील उपजिल्ह्याचा दर्जा हिरावून घेवून येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील जवळपास सर्वच महत्वाची खातीही हलवण्यात आली आहे.मात्र याही पेक्षा भयंकर म्हणजे जव्हार मध्ये २०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय आणि मेडीकल कॉलेज प्रस्तावित होते. यासाठी जव्हार संस्थानचे राजे महेंद्रसिंह मुकणे यांनी जागाहि मोफत उपलब्ध करून दिली. यामुळे समाधान व्यक्त होत असतानाच सदरचे रुग्णालय पालघरला हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत,असे सांगत या सरकारला जर खर्‍या अर्थाने आदिवासींचा उत्कर्ष करायचा असेल हे मेडीकल कॉलेज जव्हार येथेच व्हायला हवे, अशी मागणी स्थानिक आमदार सुनिल भुसारा यांनी केली आहे.

अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. पालघर तालुका हा जिल्हा मुख्यालय आहे, रेल्वे स्टेशन आहे आणि याशिवाय मोठ्या शहरांशी जोडलेला आहे. त्याविरुद्ध आदिवासींच्या सर्वाधिक लोकसंख्या ही जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यात आहे. याशिवाय या भागात आरोग्य यंत्रणांचे मोठ्याप्रमाणावर वाणवाही आहे.यामुळे भागात आरोग्यासाठी मोठे ससज्ज रुग्णालय असावे अशी मागणी नेहमीच होत होती. यासाठी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा यांनी पाठपुरावा केला होता.