वाडा : तालुक्यात काही दिवसांपासून तापमानात दिवसेंदिवस सातत्याने घसरण होत आहे. परिणामी, थंडीचा कडाका वाढत आहे. वातावरणात गारठा जाणवत असल्याने ठेवणीतील उबदार वस्त्रे बाहेर निघाली आहेत. हिवाळ्याचे दिवस असल्याने आगामी दिवसात तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण होणार आहे. नियमितपणे संध्याकाळनंतर गुलाबी थंडीची चुणूक लागली आहे. थंडीला सुरुवात झाल्यानंतर उष्ण व उपदार कपड्यांच्या मागणीतही वाढ होऊ लागली आहे. यंदा थंडीला उशिरा सुरुवात झाली असली तरी थंडीने हळू हळू का होईना, आपला प्रभाव दाखविण्यास सुरुवात केली आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत गारव्याची जाणीव होत आहे. नागरिकांना अल्हाददायी वातावरणाचा अनुभव घेण्यास मिळत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात थंडी जास्त प्रमाणात जाणवत आहे. सध्या वातावरणात गारवा पसरत असल्याने रात्री आणि पहाटेच्या सुमारास थंडीने हुडहुडी भरण्यास सुरुवात झाली आहे. थंडी वाढल्याने उबदार कपडे वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. ग्रामीण भागात शेकोट्या पेटवण्यास सुरुवात झाली आहे.
सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ
यंदा पावसाळ्यात अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने, कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता अधिक आहे. थंडीमुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी आदी आजारात वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस थंडी चांगलीच वाढणार आहे. परिणामी, हिवाळ्यात त्वचा कठोर होणे, त्वचा कोरडी पडणे, ओठ फाटणे, पायांच्या टाचांना भेगा पडणे, अशा समस्या उद्भवतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करण्याचा सल्ला वैद्यकीय देत आहेत.
Edited By Roshan Chinchwalkar