पोलीस भरती उमेदवारांची लेखी परीक्षा २६ मार्च रोजी

उमेदवारांनी वेळेवर परीक्षेच्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक आहे. परीक्षा सुरु झाल्यानंतर उशिरा आलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही.

भाईंदर :- मीरा- भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत सुरु असलेल्या पोलीस शिपाई व चालक पदाच्या प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी व कौशल्य चाचणीमधून लेखी परीक्षेसाठी १२ हजार १२४ उमेदवार पोलीस शिपाई लेखी साठी पात्र असून १०४ उमेदवार चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांच्या लेखी परीक्षेची प्रतीक्षा आता समाप्त झाली आहे.परीक्षा २६ मार्च ला सकाळी ८:३० ते १० :०० च्या या वेळेत मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्त कार्यालय, ०२ रा माळा, संवाद हॉल, राष्ट्रसंत आचार्य श्री. पद्मसागर सुरश्र्वरजी भवन, सेक्टर ५, मिरारोड पूर्व या ठिकाणी घेण्यात येणार आहे . लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

पोलीस शिपाई-चालक लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना रविवारी २६ मार्चला सकाळी ६:३० ला परीक्षेसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आयुक्तलयाच्या मार्फत पोलीस शिपाई व चालक भरती लेखी परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्याकरीता सर्व स्तरावर विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी वेळेवर परीक्षेच्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक आहे. परीक्षा सुरु झाल्यानंतर उशिरा आलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही.

1) उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना महाआयटीकडून यापुर्वी देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. ओळखपत्राशिवाय उमेदवारास परिक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार नाही.

2) महाआयटीकडून ओळखपत्र प्राप्त न झाल्यास आयुक्तलयाशी संपर्क करावा.

3) उमेदवारांना पॅड व काळया शाईचे पेन परीक्षेवेळी कार्यालयाकडून पुरविले जाणार आहेत. त्यामुळे कागदपत्रां व्यतिरीक्त इतर कोणतेही साहित्य परीक्षा केंद्रावर आणण्यास मनाई आहे.

4) उमेदवारांनी मोबाईल, स्मार्ट वॉच, गणकयंत्र इतर कोणतेही ब्लुटुथ यंत्र जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. तसे निदर्शनास आल्यास अथवा उमेदवार इतर कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा वापर करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. संबंधित उमेदवारास पुढील पोलीस भरती प्रक्रियेतून तात्काळ बाद केले जाणार आहे.