घरपालघरडहाणूच्या महालक्ष्मी मातेचा यात्रोत्सव संपन्न

डहाणूच्या महालक्ष्मी मातेचा यात्रोत्सव संपन्न

Subscribe

पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या महालक्ष्मी मातेचा यात्रोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. शेकडो वर्षांची परंपरा असलेली महालक्ष्मी मातेची यात्रा गेले दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली होती.

पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या महालक्ष्मी मातेचा यात्रोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. शेकडो वर्षांची परंपरा असलेली महालक्ष्मी मातेची यात्रा गेले दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली होती. मात्र यंदा यात्रेच्या अगोदरच राज्यातील कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल करण्यात आल्यामुळे महालक्ष्मी मातेच्या यात्रेला परवानगी मिळून यात्रा उत्सव उत्साहात संपन्न झाला आहे. डहाणूची महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या परिसरासोबत संपूर्ण महाराष्ट्र व गुजरात राज्यातून भाविक येतात. गेल्या दोन वर्षांपासून यात्रा उत्सव रद्द करण्यात आल्यामुळे भक्त भाविक, ग्रामस्थ व व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. परंतु यंदा दरवर्षीप्रमाणे यात्रा उत्सवाला परवानगी मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पावसाळ्याच्या अगोदर ही यात्रा भरत असल्यामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील आदिवासी बांधव आवर्जून यात्रेला भेट देत असून पावसाळ्या दरम्यान लागणारे घरघुती वापराचे सामान यात्रेतूनच खरेदी करतात.
आदिवासी बांधव वर्षभर जंगलातून डिंक, काजू, रिठा व इतर वस्तू जमा करून यात्रेत त्या वस्तूंच्या बदल्यात कांदे, लसून, मीठ, मसाला इत्यादी साहीत्य घेतात. महालक्ष्मी यात्रेदरम्यान अजूनही देवाण-घेवाण करण्याची पद्धत जपली जाते. यामुळे आदिवासी बांधवांना महालक्ष्मी यात्रेची ओढ लागलेली असते. तब्बल दोन वर्षानंतर यात्रा उत्सव साजरा होणार असल्यामुळे संबंधित शासकीय यंत्रणा देखील जोमाने यात्रेच्या नियोजनामध्ये लागली होती. विवळवेढे ग्रामपंचायतीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी आपली कामगिरी अगदी सुनियोजितपणे पार पडली. सोबतच मंदिराचे विश्वस्त मंडळ व सहकर्मचाऱ्यांनी देखील उत्तम कामगिरी बजावली. तसेच संपूर्ण यात्रेची देखरेख, कायदा व सुव्यवस्था यांचे रक्षण करण्याची जबाबदारी कासा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तमरित्या पार पाडली. शिवाय वैद्यकीय विभाग, विद्युत विभाग, वन विभाग, अग्निशामक दल इत्यादींनी अगदी चोखपणे आपली कामगिरी बजावली. स्थानिक, भाविक, पर्यटक, व्यावसायिक, जागा मालक या सर्वांच्या सहकार्याने विनाअडथळा महालक्ष्मी मातेचा यात्रोत्सव अगदी सुरळीत पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -