आपण पृथ्वीचे मालक नाही…केवळ एक अंग!

पर्यावरण रक्षण हा जगभरात कळीचा प्रश्न ठरलेला आहे. आपलं शहर सुंदर आणि सुरक्षित करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

सायमन मार्टिन – साहित्यिक

पर्यावरण रक्षण हा जगभरात कळीचा प्रश्न ठरलेला आहे. आपलं शहर सुंदर आणि सुरक्षित करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. कुणीतरी समुद्रकिनार्यावर प्रत्येक आठवड्याला न चुकता किनारा स्वच्छतेसाठी एकत्र जमतात आणि त्यानंतर आठवडाभर येणारा जमाव अतिशय असंस्कृतपणे तेथे कचर्याचा ढीग करून जाते, अशा परिस्थितीमध्ये शहर बदलणार नाही. प्रश्न आहे विचार बदलण्याचा. सार काही हातातून जात असताना निग्रहाने उभ राहण्याचा निषेधाचा आवाज उठवण्याचा आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये हातात हात घालून साथ देण्याचा. अजूनही वेळ गेलेली नाही सिएटल हा १९ व्या शतकातील अमेरिकतील रेड इंडियन आदिवासी जमातीचा नेता होता. त्याच्या डोळ्यादेखत त्याचं शहर लुटलं जात होतं. तेव्हा त्याने जे मनोगत व्यक्त केले. ते आपणा सर्वांसाठी मोलाचे आहे.

तो म्हणतोय की, हे आभाळ तुम्ही विकत तरी कसं घेणार आहात. पाऊस आणि वाहत्या वार्याचे मालक तुम्ही कसे होऊ शकता?, या मातीचा प्रत्येक कण आमच्या माणसासाठी पवित्र आहे. झाडाचे एकेक पान, वाळूचे सगळे किनारे, धुक्यात वेढलेली जंगले, ही मैदानं, किड्यांचं आणि भुंग्याचं गुणगुणणं… हे सगळं आम्हाला पवित्र आहे. ते आमच्या लोकांच्या स्मृतीशी गुंफलेलं आहे. इथल्या झाडांमधून वाहणारा रस मला शरीरामधून वाहणार्या रक्ताइतकाच मोलाचा वाटतोयं. आपण या पृथ्वीचा एक अंश आहोत आणि ही जमीन आपलं अंग आहे. ही सुगंधी फुले आमच्या बहिणी आहेत. ही हरणं, हे घोडे, हे गरुड, हे सगळे आमचे भाऊ आहेत. पर्वतांची शिखरं, पठारावरची हरळी आणि घोड्याचे शिंगरू, आम्ही एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत. माझ्या पूर्वजांचा आवाज मला सांगतो की, नद्यांमधून आणि झर्यामधून प्रवाहीत होणारं हे पाणी केवळ पाणीच नाही, तर ते माझ्या पूर्वजांचे रक्त आहे. या पाण्यातील प्रत्येक प्रतीबिंबामध्ये माझ्या पूर्वजांच्या आठवणी लपलेल्या आहेत. या नद्या आमच्या जीवनसंगिनी आहेत. त्याच आमची तहान् भागवतात. इथली हवा अनमोल आहे.

ही हवा सगळ्या सजीवांचे पोषण करते आणि आम्हाला आमचा आत्मा देते. या हवेनं मला श्वास दिला आहे… पहिला आणि शेवटचा. ही जमीन पवित्र ठेवणे… ही हवा पवित्र ठेवणे… आमचं कर्तव्य आहे. आपण पृथ्वीचे मालक नाही… आपण या भूमीचे केवळ एक अंग आहोत. म्हणून हे शहर सुंदर करणे, हे शहर माणसांना जगण्यालायक करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.