वसईः पालघर जिल्हा परिषदेच्या वसई- विरार महापालिका हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी युवक काँग्रेसचे कुलदीप वर्तक यांनी केली आहे. वसई- विरार शहर महापालिकेच्या हद्दीत येत असलेली पालघर जिल्हा परिषदेची आरोग्य केंद्रे महापालिकेकडून हस्तांतरित करण्यात येणार होती. सोपारा, निर्मळ, चंदनसार ही तीन आरोग्य केंद्रे व नायगाव, सांडोर, उमेळा,पेल्हार, चंदनसार, सातीवली, वालीव, जुचंद्र, चिखल डोंगरी, बोळींज ही उपकेंद्रे या आरोग्य केंद्राचा यात समावेश आहे. परंतु जिल्हा परिषद आणि महापालिका यांच्यातील हस्तांतरणाचा तिढा सुटला नसल्यामुळे हस्तांतरण प्रक्रिया अंधारातच आहे. या दिरंगाईमुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होऊन आरोग्य केंद्रांनाच इलाज करण्याची वेळ आली आहे.जिल्हा परिषदेने वसई तालुक्यात नवघर, चंदनसार, भाताणे, नालासोपारा, आगाशी, कामण, पारोळ व निर्मळ अशा आठ ठिकाणी ३२ उपकेंद्रे तयार केली आहेत.
या आरोग्य केंद्रांतून ग्रामीण तसेच शहरी परिसरातील गोरगरीब नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते. मात्र देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याने काही आरोग्य केंद्राच्या भिंतींना तडे गेले आहेत. आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेबाबत वर्तक यांना समजताच त्यांनी या गंभीर बाबी संबंधात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत तसेच पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवून या आरोग्य विषयक गंभीर समस्येवर वैयक्तिक लक्ष घालून संबंधित विभागास दुरुस्तीचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
आजारी स्लॅब ,जखमी छत
काही ठिकाणी स्लॅब निखळले आहेत, छत गळती होत असल्याने ताडपत्रीचा आधार घेऊन रुग्णांची देखभाल करावी लागत आहे.मांडवी येथील आरोग्य केंद्र तर अधिकच धोकादायक अवस्थेत असून इमारतीला लोखंडी खांबाचा टेकू लावण्यात आला आहे. पारोळ आरोग्य केंद्रात असलेले सौर ऊर्जा पॅनेल बंद पडले असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यास अंधारामुळे उपचार करण्यात अडचणी येतात. अशा विविध समस्यांमुळे आरोग्य केंद्रातील सेवक तसेच उपचारासाठी येणारे रुग्ण ह्यांना जीव मुठीत घेऊन यावे लागते.