विरार : स्वीपच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम जिल्हाभर राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आर्यन शाळेच्या मैदानावर 28 हजार स्क्वेअर फुट महाराष्ट्राचा महा नकाशा काढून मानवी रांगोळी तयार करण्यात आली. यासाठी म. नि. दांडेकर हायस्कूल, आर्यन इंग्लिश मीडियम हायस्कूल, माध्यमिक विद्यालय भगिनी समाजमधील या तीन शाळांच्या एकूण 1हजार 556 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी महारांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्याबाबतच्या संकल्पनेचे कौतुक करत स्वीप विभाग, रांगोळी काढणारे कलाशिक्षक, सहभागी शाळा, मुख्याध्यापक या सर्वांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना संकल्प पत्राची आठवण करून देत व पालक, नातेवाईक, शेजारी यांना मतदान करण्यासाठी आठवण करून देण्यास सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे ,असेही सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा स्वीप नोडल अधिकारी विजया जाधव यांनी जिल्ह्यातील विविध उपक्रमांची माहिती देत आजचा महारांगोळीचा उपक्रम विशेष असल्याचे सांगून मतदान जनजागृती सोबतच या नकाशाचा आकार आणि सहभागी विद्यार्थी संख्या पाहता विक्रमासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर ही रांगोळी साकारणार्या कला शिक्षकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र हजारे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संगीता भागवत ,शिक्षणाधिकारी ( प्राथमिक )सोनाली मातेकर, महारांगोळीसाठी समन्वयकाची भूमिका साधणारे शिक्षक सुशील शेजुळे, म.नि.दांडेकर हायस्कूल मुख्याध्यापिका जान्हवी घरत मुख्याध्यापिका माध्यमिक विद्यालय भगिनी समाज, प्रिती वर्तक व महारंगोळी काढणारे कलाशिक्षक प्रवीण अवतार, ज्ञानेश्वर माळी, भास्कर खेडकर, प्रितम घरत, सिताराम प्रभू, उज्वल पारगावकर, बँड पथकाचे प्रमुख शिक्षक समीर पिंपळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शन भंडारे यांनी केले.