घरपालघरजि.प. अध्यक्षा वैदेही वाढाण शिंदे गटात

जि.प. अध्यक्षा वैदेही वाढाण शिंदे गटात

Subscribe

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेत फूट पडल्याने उध्दव ठाकरेंना धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक मानल्या जातात.

पालघरः  पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्याआधी रविवारी जिल्हाप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेत फूट पडल्याने उध्दव ठाकरेंना धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक मानल्या जातात. त्यामुळे त्या शिंदे गटात जाणारच असा तर्क गेल्या काही दिवसांपासून व्यक्त केला जात होता. अखेर मंगळवारी त्यांच्या प्रवेशाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला राज्यात रोज धक्क्यावर धक्के बसत आहेत. पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव संखे यांच्यानंतर उपजिल्हाप्रमुख जगदीश धोडी यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या ठाणे जिल्ह्याप्रमाणेच पालघर जिल्ह्यात देखील शिवसेनेत फुटीची लागण लागली आहे. आमदार श्रीनिवास वणगा,खासदार राजेंद्र गावित या लोकप्रतिनिधींसोबत जिल्हाप्रमुख राजेश शहा,माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ,जि.प.सदस्य प्रकाश निकम हे सुरूवातीलाच शिंदे गटात सामील झाले होते. फुटीनंतर देखील बहुतेक प्रमुख पदाधिकारी हे ठाकरे गटासोबत कायम राहिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात संघटनात्मक बदल करीत केतन पाटील यांना संपर्कप्रमुख तर वैभव संखे यांच्यावर पालघर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती.

ठाकरे गटात मात्र सामसूम

- Advertisement -

कोणालाही विश्वासात न घेऊन मनमानीपणे केलेल्या फेरबदलामुळे पालघरमधील शिवसैनिकांतील नाराजी आणखीनच उफाळून आली. शिंदे गट आक्रमकपणे पालघर जिल्ह्यात आपला प्रभाव निर्माण करीत असताना संकटाच्या काळात उद्धव ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांनी पालघर जिल्ह्यातील शिवसैनिकांना अक्षरक्ष: वार्‍यावर सोडून दिल्याची खंत पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत निवडणूक तोंडावर आली असताना शिंदे गट आक्रमक पावले उचलत असताना ठाकरे गटात मात्र सामसूम दिसत असल्याने येत्या आठवड्यात उरलेले जवळपास सर्वच प्रमुख पदाधिकारी, जिप आणि पंचायत समिती सदस्य शिंदे गटात सामील होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -