आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीपर्यत आलेल्या मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वाशी येथे आले. त्यानंतर ते पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे व्यासपीठावर आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत जरांगे यांना देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हाताने मोसंबीचा रस घेऊन जरांगे यांनी आपण उपोषण सोडल्याचे जाहीर केले. मराठा समाज बांधवांची मागणी पूर्ण केल्याबद्दल जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा यावेळी सत्कार केला.