७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर २३ चित्ररथांचे संचलन

भारताच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर आज, गुरुवारी संचलन झाले. यावेळी विविध राज्यांच्या झालेल्या चित्ररथांच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधले. ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ होता. राजधानी दिल्लीच्या कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात २३ चित्ररथांचे संचलन झाले. यामध्ये १७ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश आणि सहा विविध मंत्रालये व विभागांच्या माध्यमातून देशाच्या भौगोलिक आणि समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविण्यात आले.