मुंबई : फुलांच्या माध्यमातून भारताची राष्ट्रीय प्रतीके मुंबईकरांपर्यंत पोहोचविणे ही यंदाच्या ‘मुंबई पुष्पोत्सवा’मागची संकल्पना आहे. यंदाच्या प्रदर्शनात फुलझाडांसह वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पती, फळझाडे, औषधी-सुगंधी वनस्पती, वेली तसेच भाजीपाला आणि मसाल्यांची रोपे मांडण्यात आली आहेत. अत्यंत कष्टाने आणि कल्पकतेने हे प्रदर्शन सजवण्यात आहे. मुंबईकरांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले. (सर्व छायाचित्रे – दीपक साळवी)
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले अर्थात राणीच्या बागेत मुंबई पुष्पोत्सव भरविण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते 31 जानेवारी रोजी पुष्पोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
या वार्षिक पुष्पोत्सवाचे यंदाचे हे 28 वे वर्षे आहे. शनिवार, 1 फेब्रुवारी आणि रविवार, 2 फेब्रुवारी 2025 असे तीनही दिवस सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे.
मुंबई पुष्पोत्सवाच्या यंदाच्या संकल्पनेत भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले आहे.
झेंडू आणि शेवंतीच्या फुलांनी साकारलेला तिरंगा नागरिकांचे विशेष आकर्षण ठरतोय. भारतरत्न पुरस्काराची प्रतिकृती लाकडी कलाकृतीच्या माध्यमातून साकारली आहे. राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याची रचना झेंडूच्या फुलांनी तयार केली आहे.
राष्ट्रीय जलचर प्राणी असलेले गंगा डॉल्फिन पांढऱया आणि गुलाबी रंगांच्या शेवंतीच्या फुलांनी साकारले आहे. यासह कमळ, राष्ट्रीय चलन रुपया, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय वृक्ष वड, अशोक स्तंभ, गंगा नदी, मोर आदी प्रतिकेही मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मुंबई पुष्पोत्सवाला मुंबईकर, तसेच मुंबई आणि उपनगरांतील शाळा देखील भेट देतात.