मुंबई : गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत महविकास आघाडी, महायुतीसह विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी गुरुवारी (24 ऑक्टोबर) जोरदार शक्तिप्रदर्शन करत विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी ठाकरे गटाचे मुंबईमधील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूरमधून आपला अर्ज दाखल केला. तसेच, आज जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रामधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधून अर्ज दाखल केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या.
मनसेकडून राजू पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेदेखील उपस्थित होते. तसेच मनसेचे ठाण्यातील उमेदवार अविनाश जाधव यांनीदेखील आपला अर्ज भरला.
बीडमध्ये धनंजय मुंडे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या घरी जात त्यांच्याकडून औक्षण करून घेतले.
पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनीदेखील उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी कोथरूडमध्ये रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
याशिवाय माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटीलदेखील निडणुकीच्या रिंगणात आहेत. रोहित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी तासगावमधून उमेदवारी अर्ज दाखल केला.