मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरमधील अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी शिवसेनेच्या इतर नेत्यांनी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात पूजा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शुक्रवारी (16 फेब्रुवारी) करवीरनिवासिनी आई अंबाबाईचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले.
आजच्या दिवशी आई अंबाबाई ही घोड्यावर स्वार होऊन हाती शिवधनुष्य घेतलेल्या रुपात तिची मंदिरातून पालखी काढली जाते. शिवसेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशन कोल्हापूरात पार पडत असताना देवीचे या रुपात दर्शन होणे हा पक्षाला मिळालेला देवीचा कृपाशीर्वादच ठरल्याच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाला सुजलाम सुफलाम ठेव आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचे बळ आम्हाला दे एवढेच मागणे देवीचरणी मागितल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष राजेश क्षिरसागर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.