मुंबई : घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पाला पहिल्याच दिवसापासून त्याच्या आवडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवून बाप्पाचे पूजन करण्यात आले. मात्र दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाला आज सकाळपासूनच सुरुवात झाली. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबई पालिकेकडून चोख बंदोबस्त करण्यात आला असून काही ठिकाणी कृत्रिम तलावही तयार करण्यात आले आहेत. (PHOTO Come early next year Bappas immersion for one and a half days today)
घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप देण्यात आला. मुंबईत अधूनमधून पडणाऱ्या पावसातून लाडक्या बाप्पाला भिजण्यापासून वाचवण्यासाठी भाविकांनी छत्री पकडल्याचे पाहायला मिळत आहे.
चौपाटी, खाडी, नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलाव आदी विसर्जनस्थळी विधिवत पूजन, अर्चन करून आपल्या लाडक्या बाप्पांचे मनोभावे व पावसाळी वातावरणात विसर्जन करण्यात आले.
मुंबई महापालिकेने गणेश विसर्जनासाठी नैसर्गिक व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी आरोग्य पथक, जीवरक्षक, पोलीस, पालिका नियंत्रण कक्ष, निरीक्षण मनोरे, 15 फिरते कृत्रिम तलाव, मोबाईल शौचालये, आरोग्य यंत्रणा, विद्युत व्यवस्था, निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश, निर्माल्य वाहतूक कारण्यासाठी वाहने, पार्किंग व्यवस्था केली आहे.
मुंबईसह नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात परिमंडळ-1 मध्ये वाशी-जागृतेश्वर मंदिर, कोपरखैरणे खाडी, तुर्भे, नेरूळ-चिंचवली, करावे गाव, दारावे गाव, सीबीडी-आग्रोळी, ऐरोली नाका, रबाळे-ऐरोली सेक्टर-20 खाडी, दिघा तर परिमंडळ-2 मध्ये कळंबोली-रोडपाली, खारघर-स्पॅगेटी, पनवेल-वडघरखाडी पनवेल, उरण विमला तलाव अशा एकूण 16 ठिकाणांवर दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील समुद्र, खाडी, तलाव आदी नैसर्गिक विसर्जन स्थळी आणि कृत्रिम तलाव आदी विसर्जन स्थळी एकूण 260 विसर्जन स्थळी सायंकाळी 6 वाजेपर्यंत दीड दिवसांच्या एकूण 6,960 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.
मुंबई पालिकेच्या माहितीनुसार, 30 सार्वजनिक गणेशमूर्तींचा आणि 6,930 घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे. तसेच, या 6,960 विसर्जित गणेशमूर्तींमध्ये समुद्र, खाडी, तलाव आदी 69 नैसर्गिक विसर्जनस्थळी दीड दिवसांच्या विसर्जित 16 सार्वजनिक तर, 4,111 घरगुती अशा एकूण 4,127 गणेशमूर्तींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, 191 ठिकाणच्या कृत्रिम तलावांत विसर्जित दीड दिवसांच्या 14 सार्वजनिक आणि 2,819 घरगुती अशा एकूण 2,833 गणेशमूर्तींचा समावेश आहे.