Shivjayanti 2023 | मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारीच राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यानंतर, आज त्यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आमदार सदानंद सरवणकर, मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बृहन्मुंबई महानगर पालिका व श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले होते.
अभिवादन सोहळ्यानंतर राज्यपाल क्रीडा भवन येथे महानगरपालिकेतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील उपस्थित राहिले. आज प्रथमच राष्ट्रगीतासोबत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत देखील गायले गेले.
यावेळी महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा, समूहगायन व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.