मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा आज, शनिवारी राज्य शासनाच्या वतीने ‘उद्योगरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. टाटा यांच्या मुंबईतील हालकाई बंगल्यात अत्यंत साधेपणाने झालेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
राज्य शासनाच्या उद्योग खात्याकडून देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे रतन टाटा हे पहिले मानकरी ठरले आहेत. उद्योगरत्न पुरस्कारानचे सन्मानचिन्ह तसेच २५ लाख रुपयांचा धनादेश आणि खास तयार करण्यात आलेले रतन टाटा यांचे पोट्रेट त्यांना सन्मानपूर्वक प्रदान केले.
टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि मित्रा या राज्य शासनाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष टी. चंद्रशेखर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा हेही यावेळी उपस्थित होते.
‘महाराष्ट्र भूषण’च्या धर्तीवर उद्योगरत्न पुरस्कार देऊन उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान केला जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. उद्योगरत्न पुरस्काराबरोबरच युवा उद्योजक, महिला उद्योजक आणि मराठी उद्योजक असे अन्य तीन पुरस्कार देण्याची घोषणाही उद्योगमंत्री सामंत यांनी केली होती.