मुंबई: राज्यसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांची नावं समोर आली आहे. भाजपानं महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी दिली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजीत गोपछडे यांना भाजपानं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून याबाबत अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही. महायुतीकडून आतापर्यंत चार उमेदवारांची घोषणा झाली आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया. (Photos Mahayuti s Rajya Sabha candidates announced Ashok Chavan gets a chance from BJP and Narayan Rane s address cut)
-
अशोक चव्हाण, भाजपा नेते
अशोक चव्हाण हे नांदेडमधील नेते आहेत. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी, 13 फेब्रुवारीला काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. आता याबाबत भाजपाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
2. मेधा कुलकर्णी, भाजपा नेते
भाजपाने कोथरुड मतदार संघातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मागच्या निवडणुकीत माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांना या जागेवर उमेदवारी देण्यात आली होती. या जागेवर यापूर्वी निवडून आलेल्या मेधा कुलकर्णी यांना डावलून दिलेल्या या उमेदवारीने पक्षांतर्गत पातळीवरही असंतोष निर्माण झाला होता.
3. डॉक्टर अजित गोपछडे, भाजपा नेते
अजीत माधवराव गोपछडे हे मूळचे नांदेड येथील आहेत. लिंगायत ओबीसी असणाऱ्या अजित गोपछडे यांनी संघ प्रचारक म्हणून काम केले आहे. त्याशिवाय ते कारसेवक आहेत. सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत.
4. मिलिंद देवरा, शिवसेना, शिंदे गट
दक्षिण मुंबईचे एकेकाळी प्रतिनिधित्व करणारे मिलिंद देवरा आता शिंदे गटातून राज्यसभेत जायला सज्ज झाले आहेत. दक्षिण मुंबई देशातील श्रीमंत लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. यात कुलाबा, शिवडी, भायखळा, मुंबादेवी, वरळी, मलबार हिल हे विधानसभेचे मतदारसंघ येतात. काँग्रेसमधून शिंदे गटात आलेले देवरा यांच्यामुळे उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत तसंच शिवडी-वरळीच्या उबाठा गटाच्या मतदारसंघात प्रभाव वाढवण्यासाठी शिंदे गटाला अधिक मदत होणार आहे.
5. नारायण राणे, (सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री)
राणेंचा पत्ता कट
विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता मात्र भाजपाने कापला आहे. राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. परंतु भाजपा नारायण राणेंना लोकसभेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे तसंच पंकजा मुंडे यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु पुन्हा एकदा ही नावं प्रतीक्षा यादीत राहिली आहेत.
(हेही वाचा: Maharashtra Politics : राज्यसभेची यादी पाहिल्यानंतर कीव येते; नाना पटोलेंचा महायुतीवर निशाणा)