एखाद्या धाडीचेही एकप्रकारचे ‘कॅम्पेन’ चालविले जाते, शिवसेनेचे मोदी सरकारवर शरसंधान

shiv sena uddhav thackeray targeted eknath shinde group on shivsena Alliance with Congress

मुंबई : आयकर विभागाने बुधवारी देशभरात एकाच वेळी धाडी घातल्या. सुमारे 110 पेक्षाही अधिक ठिकाणी हे धाडसत्र राबविले गेले असे सांगण्यात येत आहे. आयकर खाते काय किंवा इतर यंत्रणा काय, त्यांच्या धाडींमध्ये नवीन काही राहिलेले नाही. रोजच कुठल्या तरी यंत्रणेचे धाडसत्र कुठे ना कुठे सुरूच असते. त्यातही गेल्या सात-आठ वर्षांत त्यामध्ये एकप्रकारचे सातत्य आणि सूत्र दिसून येत आहे. म्हणजे एखाद्या धाडीचेही एकप्रकारचे ‘कॅम्पेन’ चालविले जाते, असे शरसंधान शिवसेनेने मोदी सरकारवर केले आहे.

नोंदणी आणि मान्यता न मिळालेल्या राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्या, पक्षनिधी, त्यातून झालेली फसवेगिरी, करचुकवेगिरी यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे धाडसत्र राबविले गेले. अशा 20पेक्षा अधिक राजकीय पक्षांचा ‘निधी’ आयकर खात्याच्या ‘रडार’वर आला आणि ती फसवणूक असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली, असे सांगण्यात येत आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये हे धाडसत्र राबविले गेले. ही कारवाई निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि राजकीय पक्षांच्या ‘फंडिंग’बाबत झालेल्या ‘फसवणुकी’बाबत केली गेली, हे गृहित धरले तरी केंद्रातील सत्ताधारी पक्षच फक्त ‘पाक’ आणि बाकी सगळे ‘नापाक’ असे आहे का? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखात केला आहे.

असे वातावरण निर्माण केले जाते की, जणू काही जेथे धाड पडली आहे, कारवाई झाली आहे तेथे प्रचंड गैरकारभार झाला आहे. कारवाईचा फुगा खूप फुगविला जातो, पण नंतर एकतर हळूहळू त्याच्यातील हवा निघून जाते किंवा कार्डिलिया क्रूझ प्रकरणाप्रमाणे फटकन फुगा फुटतो! अशा अनेक कारवायांचे सरकारचे हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक नव्हते हे जनतेलाही कळून चुकले आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

भाजपाशासित राज्यांत ‘रामराज्य’ असल्याचा आभास
केंद्र सरकारचे टीकाकार, विरोधी पक्ष अप्रामाणिक आणि सत्ताधारी पक्ष, त्यांचे समर्थक, भक्तमंडळी मात्र प्रामाणिक, पारदर्शक अशा प्रकारचे एक चित्र गेल्या काही वर्षांत निर्माण केले जात आहे. भाजपशासित राज्ये कायदेशीर आणि बिगरभाजप राज्ये बेकायदा अशी एक सरळ विभागणीच झाली आहे. जेथे भाजपची सत्ता नाही तेथे अनागोंदी आणि जेथे भाजप सत्तेत तेथे ‘रामराज्य’ असा एक आभास निर्माण करण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत, असा प्रश्न जनतेच्या मनात येऊ लागला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

साम, दाम, दंड, भेद या आयुधांचा वापर
सन 2014नंतर सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेत बसलेल्या आणि अशी सगळी आयुधे वापरत अनेक राज्यांमध्ये सत्तारूढ झालेल्या भाजपच्या संपत्तीत मागील काही वर्षांत 22 टक्के वाढ झाली आहे तर प्रमुख पक्षांच्या पक्षनिधीत घट झाली आहे. बुधवारी पडलेल्या आयकर खात्याच्या धाडी निवडणूक आयोगाच्या तक्रारीनुसार मान्यता आणि नोंदणी नसलेल्या राजकीय पक्षांच्या ‘फंडिंग’बाबत असतीलही, पण अशा प्रकारच्या धाडी जनतेच्या दृष्टीने विश्वासार्ह राहिलेल्या आहेत काय? असा सवालही शिवसेनेने केला आहे.