घरराजकारणआदित्य ठाकरे उद्या बिहार दौऱ्यावर, तेजस्वी यादवांची घेणार सदिच्छा भेट

आदित्य ठाकरे उद्या बिहार दौऱ्यावर, तेजस्वी यादवांची घेणार सदिच्छा भेट

Subscribe

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेली टीका तसेच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य या वरून वादंग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे हे उद्या एक दिवसाच्या बिहार दौऱ्यावर जाणार आहेत.

- Advertisement -

‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. त्यावरून वादळ उठले होते. यावरून भाजपाने राहुल गांधी यांच्याबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. तर, राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीसह शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केले आहे. राज्यात असे राजकारण रंगलेले असतानाच आदित्य ठाकरे उद्या बिहारदौऱ्यावर जात आहेत.

आपला जनता दल युनायटेड फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करून नितीश कुमार यांनी ऑगस्ट 2022मध्ये भाजपाशी साथ सोडून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपाविरोधी पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगाणाचे मुख्यमत्री के. चंद्रशेखर राव, सीपीआयचे डी. राजा, इंडियन नॅशनल लोक दलाचे ओमप्रकाश चौटाला आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेकांची आतापर्यंत भेट घेतली आहे.

- Advertisement -

तर राज्यात मध्यावधी निवडणूक होईल, असे भाकित उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील अन्य नेत्यांकडून वर्तविले जात आहे. या सर्व  पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बिहारमध्ये जात असून ते बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. त्यांच्यासमवेत अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अन्य काही नेते असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -