घरराजकारण...मग नोकऱ्या कुठून मिळणार; अजित पवारांचा राज यांना टोला

…मग नोकऱ्या कुठून मिळणार; अजित पवारांचा राज यांना टोला

Subscribe

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यांनतर महाराष्ट्रातील काही प्रकल्प गुजरातला देण्यात आले. यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद सुरु झाले. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला प्रकल्प गेले, असा आरोप शिंदे-फडणवीस सरकारने केला तर सत्ताधाऱ्यांनी हे प्रकल्प महाराष्ट्रात यावे यासाठी प्रयत्नच केले नाही, असा दावा विरोधकांनी केला.

पुणेः महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेले तर मग रोजगार निर्मिती कशी होणार. तरुणांना रोजगार कसा द्यायचा. तरुणांनी नोकरी कोणाकडे मागायची, असा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.

राज्यातून एक दोन प्रकल्प बाहेर गेले तर काहीही फरक पडत नाही. याने महाराष्ट्राचे नुकसान होत नाही. महाराष्ट्र श्रीमंत आहे. उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याने आपण उगीचच टाहो फोडत आहोत. पण सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे की आपण सर्वांपेक्षा अग्रेसर आहोत. जे आहे ते टिकवले तरी आपण पुढे जाऊ. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला प्राध्यान्य देणे अयोग्य आहे, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथील १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात रविवारी केले.

- Advertisement -

राज ठाकरे यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर नाराजीही व्यक्त करण्यात आली. तर काहींनी याचे समर्थनही केले. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी राज यांच्या वक्तव्यावर टीका केली. ते म्हणाले, प्रत्येक प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. एखादा उद्योग राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असतील आणि तो उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्यास त्याने नुकसानच होणार. कोट्यवधी रुपयांचा उद्योग गेल्यास रोजगार निर्मितीही होत नाही. तरुणांचा रोजगार बुडतो. बेरोजगारी वाढते. अशा परिस्तितीत तरुणांनी रोजगार कोणाकडे मागायचा, असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले, प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवे आहेत. राज्याबाहेर प्रकल्प जात आहेत आणि त्याचे राजकीय नेत्यांनी समर्थन करणे योग्य नाही. राज्यात प्रकल्प आले तर त्याचा लाभ सर्वांनाच होणार आहे. रोजगार निर्मिती होईल. राज्यातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल. महाराष्ट्राचा महसुल वाढेल. त्यामुळे राज्यातील प्रकल्प बाहेर जाणे हे परवडणारे नाही.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यांनतर महाराष्ट्रातील काही प्रकल्प गुजरातला देण्यात आले. यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद सुरु झाले. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला प्रकल्प गेले, असा आरोप शिंदे-फडणवीस सरकारने केला तर सत्ताधाऱ्यांनी हे प्रकल्प महाराष्ट्रात यावे यासाठी प्रयत्नच केले नाही, असा दावा विरोधकांनी केला.
Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -