घरराजकारणमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांना वेळीच आवरावे, अजित पवारांची सूचना

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांना वेळीच आवरावे, अजित पवारांची सूचना

Subscribe

मुंबई : सत्ताधारी पक्ष चुकत असेल तर त्यांना स्पष्टपणे सांगितले पाहिजे या भूमिकेतून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना तुमच्याकडे वाचाळवीरांचे प्रस्थ वाढले असून त्यांना वेळीच आवरण्याची सूचना केली, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील सहकारी बोलतात त्याने मंत्रिमंडळाची प्रतिमा खराब होते. लोक ऐकून घेत असतात… पाहात असतात… लक्षात ठेवत असतात. काहीजण सहज बोललो म्हणत आहेत. तुम्ही सहज बोलायला नागरिक नाही. तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलेली आहे, तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी वाचाळवीरांना सुनावले.

अजित पवार यांनी आज पक्ष कार्यालयात जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी प्रशासनावर विशेषतः पोलिसांवर सत्ताधारी पक्षाचा दबाव असल्याचा आरोप केला. राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार आल्यापासून सत्ताधाऱ्यांचा राज्य आणि पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव आहे. या दबावामुळे पोलीस प्रशासन आणि सचिव तणावात आहेत, असे अजित पवार म्हणाले. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर राज्याचे चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा देताना पवार यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना आपली भूमिका कणखरपणे मांडण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

गेल्या चार महिन्यापासून पोलीस विभाग प्रचंड तणावात आहे. ठाण्यात काल अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस आमचे ऐकत नसल्याची तक्रार केली. तर, वरिष्ठ पातळीवरून फोन येत असल्याने आमचा नाईलाज आहे, असे पोलीस सांगतात. थेट मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येत असल्याने प्रशासन दबावात काम करत असल्याचा दावा पवार यांनी केला. सरकार चालवताना एक धोरण, प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे. आपल्या जवळचे लोक चुकत असेल तर तसे स्पष्टपणे सांगितले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.ट

सत्तारांचा घेतला समाचार
अजित पवार यांनी यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचाही समाचार घेतला. सत्तार हे माझी बहीण सुप्रिया सुळे यांना काही बोलले. आता ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ हेच त्यांना बोलले पाहिजे. मंत्री केले म्हणजे आपण वेगळे झाले का? मंत्री पदे येतात… जातात… कोण आजी… कोण माजी असतात. परंतु शेवटी आपण नागरिक आहोत. संविधान, कायदा, नियम याचा सर्वांनी आदर करायचा असतो. पण यामध्ये हे चुकत आहेत, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

सुरक्षाव्यवस्थेबद्दल सरकारवर टीका
राज्य सरकारने विरोधी पक्षाच्या काही नेत्यांची सुरक्षा कमी करताना सत्ताधारी पक्षातील नेत्यांना पोलीस सुरक्षा पुरवली. या निर्णयावरूनही पवार यांनी सरकारवर टीका केली. किती लोकांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे, याची माहिती आपण माहितीच्या अधिकारात मागवली आहे असे ते म्हणाले. काहींचा तर 30 – 30 सरकारी गाड्यांचा ताफा फिरत आहे. हा पैसा तुमचा नाही, सरकारकडे कररूपाने जमा झालेला जनतेचा पैसा आहे. ज्या आमदाराला बंदोबस्त द्यायचा असेल त्याला जरुर द्या. आमदारांचे आणि नागरीकांचे संरक्षण करणे, ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सरसकट सगळ्यांना संरक्षण? काही माजी नगरसेवकांना सरकारी संरक्षण? माजी नगरसेवकाला कोण काय करणार आहे? तो माजी झाला ना, त्याने गंभीर चुका केल्या असतील तर तो निस्तारेल. त्यासाठी सरकारी यंत्रणांचे संरक्षण देण्याची काय आवश्यकता? असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.

पाच दिवस परदेशात होतो
माझा पाच दिवसाचा परदेशातील कार्यक्रम फार पूर्वी ठरला होता, तो रद्द करता आला नाही. शिर्डीतील शिबीराला एक दिवस उपस्थित राहून गेलो. मात्र एवढया दिवसांत मी समोर आलो नाही तर अजित पवार कुठे गेले आहेत? अजित पवार उपलब्ध नाहीत? अशा काही बातम्या येत होत्या. जे काही आहे, ते मी स्पष्टपणे सांगत असतो. राजकारणात असल्यामुळे लोकांमध्ये काम करत असताना अशा गोष्टी लपवून ठेवणे चालत नसते. मात्र चार – पाच दिवसांत ज्या काही घटना घडल्या, त्यावेळी मी इथे नव्हतोच, असा खुलासा पवार यांनी केला.

मनस्तापाचा शिधा
आनंदाचा शिधा आता जनतेच्या दृष्टीने ‘मनस्तापाचा शिधा’ झाला आहे. महाराष्ट्रातील लोकांना अजून शिधा मिळालेला नाही. एका तर बहाद्दर मंत्र्यांने सांगितले की, तुळशीचे लग्न होईपर्यंत दिवाळी असते, तोपर्यंत देऊ. पण अजूनपर्यंत दिलेला नाही. ओला दुष्काळाकडे तर सरकारचे लक्षच नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -