घरराजकारणमोदी-शहांनी ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

मोदी-शहांनी ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Subscribe

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. मात्र, या आरोपात तथ्य नसून अमित शाहांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांची प्रकट मुलाखतही घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. राज्यात 2019मध्ये विधानसभा निवडणुकीला शिवसेना आणि भाजपा एकत्रितपणे सामोरे गेले. मात्र सत्तास्थापनेच्या वेळी मुख्यमंत्रीपदावरून दोघांमध्ये बिनसले. मातोश्रीवर बंद दाराआड झालेल्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्याला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. पण तसा कोणताही शब्द दिला नसल्याचे अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजपा नेत्यांनी स्पष्ट केले. परंतु तरीही, भाजपाबरोबर फारकत घेत, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी आघाडी करत सरकार स्थापन केले. पण एकनाथ शिंदे आणि अन्य 50 आमदारांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार नंतर कोसळले व शिंदे-फडणवीस सरकार आले.

- Advertisement -

निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत काय बोलणी झाली होती, याची मला माहिती नव्हती. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यावर मी दिल्लीला गेलो होतो. तिथे पंतप्रधान मोदी व अमित शहांची भेट घेतल्यावर त्यावेळी बंद दाराआड नेमके काय बोलणे झाले हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा उद्धव ठाकरे यांना कोणताही शब्द दिला नव्हता. उलट आधीचाच फॉर्म्युला कायम ठेवण्यास सांगितले होते, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

आमची कमिटमेंट फायनल असते. आम्ही तिकडे बिहारमध्ये कमी जागा आलेल्या नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले होते. तुमचे आमदार कमी असतानाही तुम्ंहाला मुख्यमंत्री केले. अशा वेळी आम्ही उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द आम्ही का फिरवला असता? कारण जनतेने कौलही आमच्याच बाजूने दिला होता, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितल्याचे शिंदे म्हणाले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -