“माझ्या ताईचा साधेपणा..” म्हणत मिटकरींची चित्रा वाघ यांच्यावर टीका

९ मार्चला सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना एसटी प्रावासात ५० टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपच्या महिला नेत्या चित्र वाघ यांनी सुद्धा या सुविधेचा फायदा घेत एसटीमधून प्रवास केला. पण यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.

Amol Mitkari's criticism of Chitra Wagh

मागील आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकलप जाहीर केला. यामध्ये त्यांनी महिलांना एसटी प्रवासामध्ये ५० टक्के सूट देण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. याचेच औचित्य साधून भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी शनिवारी (ता. १९ मार्च) नाशिक ते मालेगावचा प्रवास लालपरीने म्हणेजच एसटीमध्ये बसून केला. यावेळी त्यांनी बसमधील महिला प्रवाशांना पेढे देखील वाटले. याचे फोटो चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटरला आणि इतर सोशल मीडिया अकाउंटला शेअर केले आहेत. पण यामुळे आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे त्यांच्या गोड शब्दांत टीका करणाऱ्या स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. तसेच ते त्यांच्या वक्तव्यांमुळे सुद्धा नेहमीच चर्चेत राहतात असतात. आता पुन्हा एकदा अमोल मिटकरी हे आपल्या ट्विटमुळे चर्चेचा भाग बनले आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एसटी बसमधून प्रवास केला. पण यांवर सुद्धा त्यांनी टीका केली आहे. अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्या एसटी प्रवासाचा फोटो ट्विट करत म्हंटले आहे की, “माझ्या ताईचा साधेपणा बघा. डाव्या हातात महागड्या वस्तु असतानाही महाराष्ट्र सरकारने एसटीचे तिकीट महिलांसाठी 50 टक्के केल्यानंतर ताईंनी एसटी बसने प्रवास करत पक्ष प्रचार करणे ही बाब अद्भुत आहे.ताई खरोखरच एसटीने प्रवास केल्याबद्दल आपणास साष्टांग दंडवत #माझीताई”

अमोल मिटकरी यांच्या या ट्विटला चित्रा वाघ यांच्या समर्थकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एका नेटकऱ्याने या ट्वीटला उत्तर देत लिहीले आहे की, “कधीतरी चांगल्या निर्णयाचे कौतुक करा,नेहमी बाजारू पद्धतीने विचार करणं गरजेचा आहे का?” तर “आपल्या साहेबांना छत्री असूनही भिजायचे नाटक करता येते तशी नाटकी तर नाही केली ताईंनी.त्यांनी तर सरकारी निर्णयाचा लाभ घेतला.आपण आमदार आहात एसटीची प्रवास मोफत आहे आपण का नाही जात? आपण टोल नाक्यावरून फुकट जाता ना…. गाडी घेऊन” असे आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे.

दरम्यान, महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सूट देण्यात आली असली तरी महिलांनी याबाबत फारसा आनंद व्यक्त न केल्याचेच दिसून येत आहे. कारण बऱ्याचशा महिला या एसटीचा रोज प्रवास करत नाही. त्यामुळे एसटीच्या प्रवासात सूट देण्यापेक्षा गॅसचे भाव कमी केले असते तर अधिक आनंद झाला असता, असे मत महिला वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाला पंचामृत असे म्हणत फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.


हेही वाचा – चुंबन घेणे गुन्हा आहे का? रोखठोक भूमिका घेत ठाकरे गटाची शिंदे सरकारवर टीका