Eco friendly bappa Competition
घर राजकारण महाराष्ट्रात 'खोके क्रांती' करण्यात आशर यांचा मोठा आर्थिक हातभार, ठाकरे गटाचे शरसंधान

महाराष्ट्रात ‘खोके क्रांती’ करण्यात आशर यांचा मोठा आर्थिक हातभार, ठाकरे गटाचे शरसंधान

Subscribe

आशिष शेलार यांचाच दावा होता की, आशर हे मुख्यमंत्री शिंदे यांचे 'फ्रण्ट मॅन' आहेत. याबाबत विरोधी पक्षाकडे काही स्फोटक बॉम्बगोळे आहेत व ते नागपुरात फुटल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

मुंबई : निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली असून राज्य शासनाने या संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर आणि डॉ. राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती केली आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिंदे गटावर शरसंधान केले आहे. महाराष्ट्रात ‘खोके क्रांती’ करण्यात या आशर यांचा मोठा आर्थिक हातभारही लागला आहे. त्याच उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या मुख्यमंत्र्यांनी आशर यांची प्रतिष्ठापना केली, पण त्यात महाराष्ट्राचे काय भले होणार? महाराष्ट्रातून गुजरातेत पळवून नेलेले उद्योग या महाशयांनी पुन्हा परत आणायला हवेत, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे खासमखास बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात म्हणे ‘मित्र’ म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली ती बहुधा या अजय आशर महाशयांसाठीच. महाराष्ट्रात एकापेक्षा एक वरचढ असे तज्ज्ञ, आर्थिक क्षेत्रातील जाणकार, उद्योग क्षेत्रातील महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी या पदावर नेमले ते खोके सरकारचे ‘टेकू’ असलेल्या अजय आशर यांना, अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाच्या अग्रलेखातून केली आहे.

- Advertisement -

अजय आशर यांच्या गुजरात संबंधानेच महाराष्ट्रातील फुटीर आमदारांना सुरतचा मार्ग दाखवला. सुरतला ‘हिसाब-किताब’ झाल्यावर मग गुवाहाटी. ही सर्व खोके व्यवस्था करणारे हे महाशय महाराष्ट्राच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होतात. हे जंतर-मंतर फक्त सध्याचे मुख्यमंत्रीच करू शकतात, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

आशिष शेलार यांच्यावर टीका
महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्या आशिष शेलार यांनीच श्रीमान आशर यांच्यावर यापूर्वी हल्ला केला होता. आधीच्या सरकारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर आरोप करताना ‘नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्या खात्याचे सर्व निर्णय हेच आशर महाशय परभारे घेतात,’ असा आरोप भाजपच्या शेलारांचा होता. आता तर महाराष्ट्राच्या आर्थिक व उद्योग धोरणांबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांनी भाजपास न जुमानता घेतले व शेलारमामा हात चोळत बसले. अर्थात विरोधी पक्ष हात चोळत बसणार नाही. तो एकजुटीने सरकारला सळो की पळो करून सोडेल, असा ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

नागपुरात फुटणार बॉम्बगोळे
खासगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्व समावेशक विकास साधण्यासाठी ‘मित्र’ची स्थापना करण्यात आली आहे. अध्यक्षपदी मुख्यमंत्री व सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री आहेत, पण हे अजय आशरच ही संस्था चालवतील. कारण आशिष शेलार यांचाच दावा होता की, आशर हे मुख्यमंत्री शिंदे यांचे ‘फ्रण्ट मॅन’ आहेत. याबाबत विरोधी पक्षाकडे काही स्फोटक बॉम्बगोळे आहेत व ते नागपुरात फुटल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

- Advertisment -