गटातटाच्या राजकारणावरून दोन ‘रामां’चा संयम सुटला, एकमेकांना शिव्यांची लाखोली!

मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे आता उद्धव ठाकरे समर्थक गट आणि मुख्यमंत्री एकनाथ समर्थक गट तयार झाले आहेत. शिंदे गटाची पाठराखण करणाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे. त्यापैकीच एक माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम आहेत. अलीकडेच त्यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून एका कट्टर शिवसैनिकाबरोबर त्यांची फोनवर जुंपल्याचे समोर आले आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी संघर्ष केला आणि त्यांचाच मुलाने या दोन्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्रीपद स्वीकारले, अशी जाहीर नाराजी रामदास कदम यांनी व्यक्त केली होती. दोन्ही काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करू नये, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती केली होती. पण त्यांनी ती ऐकली नाही, असा खेदही त्यांनी व्यक्त केला होता. तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

तर दुसरीकडे, शिंदे गटाने जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी जाहीर करून रामदास कदम यांची नेतेपदी फेरनियुक्ती केली. या पार्श्वभूमीवर त्यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मला गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून फोन येत आहेत. भाई आम्हाला तुमच्यासोबत यायचे आहे, आम्हालाही यायचे आहे, असे अनेक जण सांगत आहेत. एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्याकडे येण्यास महाराष्ट्रातून प्रचंड ओघ आहे, असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

मात्र, काही फोन रामदास कदम यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करणारे देखील असल्याचे समोर आले आहे. रामदास कदम आणि कथित रामचंद्र गायकवाड या कट्टर शिवसैनिकाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या शिवसैनिकाने फोनवरून रामदासभाईंना, तुम्ही सध्या कोणत्या गटात आहेत? हा प्रश्न विचारला आणि त्यानंतर त्या दोघांच्यात जुंपली. संतापलेल्या रामदास कदम यांनी शिव्या देण्यास सुरुवात केल्यावर कथित रामचंद्र गायकवाड यानेही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिल्याचे या ऑडियो क्लिपमध्ये ऐकायला मिळते. तथापि, ‘My Mahanagar’ या ऑडियोची पुष्टी करत नाही.

हेही वाचा – शिंदे सरकारचा ठाकरे सरकारच्या कामांना धक्का; 14 महिन्यांतील निविदा कामांना स्थगिती