बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणीने मुख्यमंत्री शिंदे झाले भावूक

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज (ता. २३ जानेवारी) संपूर्ण राज्यात साजरी करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून राज्यात बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विधिमंडळात देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. याचेच औचित्य साधून विधिमंडळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे हे भावूक झालेले पाहायला मिळाले. क्षणोक्षणी मला बाळासाहेबांची आठवण येते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. पण त्याआधी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘बाळासाहेब यांचे योगदान केवळ राज्यातच नाही तर जगभरात आहे. बाळासाहेबांमुळेच सर्वसामान्य कार्यकर्ते आज अनेक मोठ्या पदावर आहेत. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्तादेखील त्यांच्याच विचारांनी प्रभावित होता. त्यांच्याचमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. मला काम करण्याची संधी मिळाली आहे.’

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. सगळं काही योगदान त्यांचेच आहे. एकही क्षण जात नाही की, त्यांची आठवण येत नाही. त्यांची जी काही शिकवण आहे, ती सर्वसामान्यांना न्याय देणारी आहे. त्यांच्या विचारांच्या आधारांवरच हे सरकार स्थापन करण्यात आले आहे. अनेक निर्णय आम्ही जनतेच्या हिताचे घेतले आहेत.’

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त करण्यात येणाऱ्या तैलचित्राच्या उदघाटनाप्रसंगी विविध राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांना आमंत्रित केले गेले आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे. तथापि, आमंत्रण देऊन देखील ठाकरे कुटुंबातील नेमके कोण या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, हे अद्यापही समजू शकलेले नाही. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संपर्क साधला आहे. बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा सोहळा हा भव्यदिव्य होणार असल्याचे राहुल नार्वेकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.