आसाममध्येही पोस्टरबाजी : ‘शिंदे साहब हम आपके साथ है’

मुंबई : गेले काही दिवस महाराष्ट्रात जोरदार सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेमध्ये नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बंडखोरी झाली असून त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या बंडखोरांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तर, बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी, विशेषत: ठाण्यात बॅनरबाजी केली. पण हे लोण आता आसामपर्यंत पोहोचले आहे.

हिंदुत्वाशी फारकत घेतल्याचा आरोप करत सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि इतर लहान घटक पक्ष तसेच अपक्षांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. यातील काही बंडखोरांनी सुरुवातीला सुरत गाठले होते. त्यानंतर ते आसामच्या गुवाहाटीमध्ये रेडिसन ब्लू होटेलमध्ये तळ ठोकला आहे. यामुळे राज्यातील ठाकरे सरकारला धोका निर्माण झाला आहे. शिवाय, हा राजकीय वाद थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे.

तर, दुसरीकडे शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन सुरू केले आहे आणि समर्थक या बंडखोर आमदारांच्या ठामपणे पाठीशी उभे आहेत. अशातच गुवाहटीतील एक पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो असून ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ आणि ‘शिंदे साहब हम आपके साथ हैं’ असे लिहिले आहे.