विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे खडसे तर सेनेचे अहिर डेंजर झोनमध्ये

भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड, राष्ट्रवादीकडून एकनाथ खडस व रामराजे निंबाळकर, काँग्रेसकडून भाई जगताप व चंद्रकात हंडोरे तर शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि सचिन अहिर हे उमेदवार आहेत. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक आहेत.

राज्यसभा निवडणुकीनंतर (Rajya Sabha elections) आता विधानपरिषद निवडणुकीमुळे (maharshtra Legislative Council Election) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा धक्कादायक पराभव केल्याने महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर २० जून रोजी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. संख्याबळानुसार सर्वच पक्षांचे मिळून ९ उमेदवार निवडून येतील. या निवडणुकीत गुप्त मतदान होणार असल्याने १० व्या जागेसाठी घोडेबाजार होणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे (Eknath Khadse), शिवसेनेचे सचिन अहिर (Sachin Ahir) आणि भाजपचे प्रसाद लाड (prasad lad) यांच्यामध्ये दहाव्या जागेवर चुरस असणार आहे. मात्र, एकनाथ खडसे आणि सचिन अहिर हे डेंजर झोनमध्ये येण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीतील विजयामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपने या निवडणुकीतही चमत्कार केल्यास पराभवाचा नक्की धनी कोण?  एकनाथ खडसे, सचिन अहिर की चंद्रकांत हंडोरे?

पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक

भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड, राष्ट्रवादीकडून एकनाथ खडस व रामराजे निंबाळकर, काँग्रेसकडून भाई जगताप व चंद्रकात हंडोरे तर शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि सचिन अहिर हे उमेदवार आहेत. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार, भाजपचे ४, राष्ट्रवादीचे २, शिवसेनेचे २ आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांच्यात लढत होईल.

नाराजी भोवणार?

हंडोरे आणि लाड यांच्यात काँटे की टक्कर होण्याची शक्यता असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील अंतर्गत नाराजीचा फटका त्यांच्या उमेदवारांना बसू शकतो. शिवसेनेचे सचिन अहिर आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांची जागा यामुळे धोक्यात येऊ शकते. सचिन अहिर हे शिवसेनेचे पहिल्या पसंतीचे तर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार आहेत. मात्र, दोन्ही पक्षातील अंतर्गत नाराजी खडसे आणि अहिर यांना भोवू शकते. याचे कारण म्हणजे हे दोन्हीही उमेदवार कानामागून आले आणि तिखट झाले असेच आहेत. खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये तर अहिर हे राष्ट्रवादीतून शिवसेनेते आले आहेत.

आदित्य यांचा मार्ग निर्धोक

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघातून विधानसभेत निवडून जाण्याचा मार्ग सुकर होण्यासाठी अहिर यांच्यासाठी सेनेने पायघड्या घातल्या. अहिर यांनी याआधी वरळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी अहिर यांचा पराभव केला. त्यानंतर २०१९ मध्ये शिंदे यांनी आदित्य यांच्यासाठी जागा रिकामी केली. मात्र, अहिर यांचा या मतदारसंघातील प्रभाव लक्षात घेऊन सेनेने त्यांना आपल्याकडे घेऊन आदित्य यांचा मार्ग निर्धोक केला.

एकाच मतदारसंघाला ३ आमदार

सुनील शिंदे यांना पक्षनिष्टेचे फळ विधानपरिषदेच्या रुपाने देण्यात आले. तर आता सचिन अहिर यांनाही भविष्यात आदित्य ठाकरे यांची वाटचाल सुरळीत राहण्यासाठी विधानपरिषदेची बक्षिसी देण्यात येत आहे. अहिर हे विधानपरिषदेवर निवडून गेल्यास एकट्या वरळी मतदारसंघाला आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि अहिर असे तब्बल ३ आमदार मिळणार आहेत. तीन आमदार असलेला वरळी हा राज्यातील एकमेव मतदारसंघ असेल. शिवसेनेत विधानपरिषदेसाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, त्यांना डावलून अवघ्या ३ वर्षांपूर्वी आलेल्या अहिर यांना उमेदवारी दिल्याने सेनेत अंतर्गत नाराजी असल्याचे बोलले जाते. ही नााराजी अहिर यांना भोवण्याचीही चिन्हे आहेत.

फडणवीस वचपा काढणार?

दुसरीकडे तब्बल ४० वर्षे भाजपमध्ये राहून जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नाराजीतून राष्ट्रवादीची वाट धरली. त्यांचेही पुर्नवसन राष्ट्रवादीकडून केले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अनेक जुने नेते, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. तसेच खडसेंना ताकद देऊन अजितदादांना विरोध करण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे बोलले जाते. ही नाराजीही त्यांना भोवू शकते.  राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर हे विधानपरिषदेचे सभापती आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे पहिल्या पसंतीचे ते उमेदवार आहेत. तर एकनाथ खडसे हे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार आहेत. संख्याबळानुसार राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून येऊ शकतात.  पण खडसे यांना पक्षांतर्गत नाराजीतून अपशकुन होण्याचीही दाट शक्यता आहे. तसेच या निवडणुकीत खडसे हे भाजपचेही टार्गेट असतील. भाजप सोडताना खडसे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टिका केली होती. त्यामुळे याचा वचपा ते या निवडणुकीत काढण्याची शक्यता आहे. खडसे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार असल्याने त्यांचा पराभवही करणेही फडणवीस यांना सोपे जाऊ शकते.

पाडवीही बळीचा बकरा?

शिवसेनेचे पहिल्या पसंतीचे उमेदवार सचिन अहिर तर दुसऱ्या पसंतीचे उमेदवार आमशा पाडवी आहेत. यावरूनही सेनेत नाराजी असल्याचे बोलले जाते. राज्यसभेसाठी जसे संजय पवार यांना बळीचा बकरा बनवले तसेच पाडवी यांनाही बळीचा बकरा बनवले जात आहे का असा प्रश्नही पक्षात उपस्थित केला जात आहे. सचिन अहिर हे दोन वेळा आमदार आणि राज्यमंत्रीपदीही राहिले आहेत. आर्थिकदृष्ट्या ते सक्षम आहेत. त्या तुलनेत आमशा पाडवी यांची आर्थिक ताकद अजिबात नाही. शिवसेनेचे नंदूरबारचे जिल्हा प्रमुख असलेल पाडवी हे जुने आणि कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्यासारखा  शिवसैनिक विधानपरिषदेत जाण्यासाठी अहिर यांच्याएेवजी पाडवी हे पहिल्या पसंतीचे उमेदवार असावेत अशी पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

काँग्रेसचा पहिल्या पसंतीचा उमेदवार कोण?

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे पहिल्या पसंतीचे तर चंद्रकांत हंडोरे हे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. भाई जगताप दोन वेळा विधानपरिषेवर निवडून गेले आहेत. आर्थिकदृष्ट्या ते सक्षम असलेले उमेदवार आहेत. तर दलित चेहरा असलेले चंद्रकांत हंडोरे यांनी काँग्रेसकडून मंत्रिपद भूषवले आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारात लढत असणार आहे. त्यामुळे हंडोरे आणि भाजपचे आर्थिकदृष्ठ्या पाॅवरफुल असलेले प्रसाद लाड यांच्यात लढत झाल्यास हंडोरे यांच्यासाठी ही निवडणूक कठीण जाऊ शकते. त्यामुळे भाई जगताप हे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार असल्यास ही लढत तुल्यबळ होऊ शकते, असेही बोलले जाते.